शहरात दूधकोंडी ; गुजरातचे दूधही उशिरा 

कोल्हापूर, सांगलीतील पुरामुळे दुधाचा तुटवडा : महामार्गावरील वाहतूक मंदावल्याचा फटका

पिंपरी – कोल्हापुर, सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर मागच्या काही दिवसापासून पिंपरी-चिंचवड शहरातील दुधाची आवक मोठ्या प्रमाणात घटली होती. दुधाचा पुरवठा कमी झाल्याने सर्वसामान्यांना दुधाचा तुटवडा सहन करावा लागत आहे. वर्षानु-वर्षे नागरिक काही ठरलेल्या दूध उत्पादक डेअरीचे दूध घेत असतात. सध्या जे मिळेल ते दूध घ्यावे लागत असून काही ठिकाणी दुधाचे दर वाढवून विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे. आता गुजरातमधून शहरात येणारे दुग्ध वाहनांनाही उशीर होत असल्याने शहरातील दूधकोंडी वाढत आहे.

पिंपरी-चिंचवड शहराला ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच दुधाच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पिंपरी-चिंचवड शहर तसेच मावळ परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने अपेक्षित दुधाचा पुरवठा होत नव्हता. गेल्या आठवड्यापासून हा पाऊस कमी झालेला असतानाच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापुराची परिस्थिती ओढावली. त्यामुळे, सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यातून शहरात येणारा दूध पुरवठा पूर्णत: बंद झाला आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात दुधाची आवक होते.

मात्र, अचानक ही आवक घटल्यामुळे शहरात दुधाची टंचाई जाणवू लागली होती. ही टंचाई कमी करण्यासाठी शहरात इतर ठिकाणाहून दुधाची आवक करण्यात येत होती. मात्र, आता पिंपरी-चिंचवड शहरात गुजरातमधून येणारे दूधही वेळेवर पोहचत नसल्याने कोंडी अधिकच वाढली आहे. सध्या, कोल्हापूर, सांगली येथील दुध पुरवठा बंद असल्याने नागरिकांना गुजरातमधून येणाऱ्या दुधाचा आधार होता. मात्र, गुजरातमध्येही काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाल्याने महामार्गावरील मंदावली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपासून महामार्गावरील वाहतूक कोंडी, पाऊस या कारणामुळे गुजरातमधून दररोज येणारे दूध उशिरा पोहचत आहे. त्यामुळे, सकाळच्या वेळी दूध खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना मिळेल ते दूध घेऊन किंवा रिकाम्या हाताने परतावे लागत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here