खालापूर, (वार्ताहर) – ताकई गावाजवळील बोंजर सोसायटीतील सांडपाणी शेतातून नाल्यात सोडले जात आहे. त्यामुळे शेतांमध्ये झुडुपे आणि मच्छराचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही खोपोली नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केल्याने दुर्गंधी पसरली आहे.
ताकईगावात गगनचुंबी इमारती उभ्या राहत आहेत. मात्र योग्य नियोजन केले नसल्यामुळे सांडपाणी शेतातून रस्त्यावर येत आहे. सर्वात मोठी बोंजर सोसायटीत ५०० फ्लँट धारक वास्तव्यास आहेत. सांडपाण्यामुळे झुडपे वाढली असून विषारी सापांचा वावरही वाढला आहे.
खोपोली नगरपालिकेने सांडपाण्याचे नियोजन करावे यासाठी शेतकरी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मात्र प्रशासन नागरिकांच्या मागणीला केराची टोपली दाखवत आहे. अखेर संतप्त शेतकऱ्यांनी नाल्यावर मातीचा ढिगारा टाकल्यामुळे सांडपाणी ताकई–आडोशी रस्त्यावर आले आहे. वाहने जाताना खड्यांमध्ये तुंबलेले सांडपाणी पादचाऱ्यांच्या अंगावर उडत आहे. तसेच दुर्गंधीही पसरली आहे.
ताकई गावात अनेक इमारती उभ्या राहत आहे. याठिकाणचा सांडपाणी आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. नगरपालिका सांडपाण्याचा नियोजन करण्यात अकार्यक्षम आहे. त्यामुळे ताकई रस्त्यावरील सांडपाण्याचे व्यवस्था करा अन्यथा नगरपालिकेच्या विरोधात तिव्र आंदोलन करीत रास्तारोको करावा लागेल. – किशोर पाटील, चिटणीस, शेकाप खालापूर तालुका
ताकई गावच्या हद्दीतील लोकवस्ती वाढली आहे. सांडपाणी वाहून नेण्यासाठी मुख्य गटार नसल्यामुळे बोंजर सोसायटीसह इतर इमारतींमधील सांडपाणी रस्त्यावर पसरले आहे. आमचा कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही. – समीर देवकर, अध्यक्ष, बोंजर सोसायटी, ताकई