नीरा (वार्ताहर) – अतिदुर्मिळ असणाऱ्या टोरनॅडो वादळाची अनुभूती पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावातील ग्रामस्थांनी घेतली. शेपटाची बाजू मोठी असणाऱ्या या चक्रीवातात काळे ढगही गोलाकार फिरतानाचे मनोहारी दृश्य पाहायला मिळाले.
पिसर्वे गावात रविवारी (दि. 26) दुपारनंतर ढगांमधून चक्रीवात फिरत होता. ढगांची शेपटी ही जमिनीच्या बाजूने होती. ग्रामस्थ या
प्रकाराने अवाक् झाले. प्रत्येकाने अनुभवलेला हा आविष्कार मोबाइलमध्ये कैद केला. हे वादळ आकाशात तयार होऊन जमिनीकडे झेपावताना दिसले. पावसाचा जोर वाढल्यानंतर हे वादळ विरून गेले, असे स्थानिक संदीप बनसोडे यांनी सांगितले. हा चक्रावाताचा प्रकार टोरनॅडो म्हणून ओळखला जातो. भारतात असे चक्रावात अभावानेच घडतात.
ढगांची घनता जास्त असणाऱ्या ठिकाणी त्याची निर्मिती होऊन ते पृथ्वीच्या दिशेने झेपावतात. त्याचा वेग जास्त असला तरी त्याची ताकद कमी असल्याने ते फारसे नुकसानकारक नसते, असे पर्यावरण अभ्यासक आणि जलतज्ज्ञ डॉ. महेश गायकवाड यांनी सांगितले. तालुक्यातील जेजुरी जवळील मल्हारसागर तलावात दोन वर्षांपूर्वी असाच चक्रावात जलाशयात तयार होऊन आकाशाकडे झेपावले होते. त्यानंतर काही वेळात प्रचंड मुसळधार पाऊस झाला होता. रविवारी पुन्हा दुसऱ्यांदा पुरंदर तालुक्यातच हे दुर्मिळ वादळ दिसले.
असा होतो टोरनॅडो चक्रावात
गरम पाण्याचे वाष्पात रूपांतरित होऊन ते आकाशाकडे जाते. अत्यावेळी थंड हवेचा त्यावर परिणाम होऊन असे चक्रावात निर्माण होतात. त्यात तापमान अधिक असल्यास या चक्रावातावर त्याचा परिणाम होतो. या बाष्पात मिसळलेले धुलीकण चक्रावाताच्या स्तंभाच्या आकारात एकत्र येतात.