पुणे – शहरात सक्रीय करोना बाधितांची संख्या 15 हजारांपेक्षा जास्त असली, तरी सौम्य लक्षणे असलेल्यांची आणि आयसोलेशन केलेल्यांची संख्या 2,246 इतकी आहे. त्यामुळे सुमारे साडेसात हजार आयसोलेशन बेड्स रिकामे असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.
महापालिकेने शहराच्या विविध भागात करोना बाधितांसाठी केअर सेंटर सुरू केली आहे. जुलैमध्ये करोनाचा वाढता प्रकोप पाहता ही संख्या वाढवण्यात आली होती. या माध्यमातून सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी 9 हजार 576 बेडची सुविधा केली होती. मात्र, आता या बेडपैकी तब्बल 7 हजार 330 बेड्स रिकामे आहेत. सौम्य लक्षणे असणारे रुग्ण होम आयसोलेशनमध्ये जात असल्याने कोविड केअर सेंटरमध्ये केवळ सव्वादोन हजार रुग्ण ठेवले आहेत.
एकिकडे कोविड केअर सेंटरमधील बेड ओस पडले असतानाच व्हेंटिलेटरची मात्र अद्यापही कमतरताच आहे. सद्यस्थितीला 492 व्हेंटिलेटर असून, त्यामधील एकही रिक्त नाही. तर व्हेंटिलेटर नसलेल्या आयसीयू बेडची संख्या 360 इतकी असून, त्यामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 320 इतकी आहे.
दोन आठवड्यांपूर्वी प्रशासनाने आठ कोविड केअर सेंटर्स बंद केली आहेत. आणखी काही बंद करणार असून, त्या रुग्णांना जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात येणार आहे.