आत्तापर्यंत पाच पोलिसांवर कारवाई : “एटीएम’ सुरक्षेबाबत बॅंकांची दिरंगाई
पिंपरी – रात्रगस्तीवर असणाऱ्या पोलिसांना गस्त घालताना शहरातील एटीएम सेंटर आणि सराफांच्या दुकानावर विशेष लक्ष देण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. रात्रगस्तीवर असताना एटीएम सेंटरला भेट दिली नाही. यामुळे एटीएम फोडल्याची घटना पोलिसांना नागरिकांकडून कळाली. याची गंभीर दखल घेत एका घटनेत पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी वाकड पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले. तर दुसऱ्या घटनेत एक अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले. त्यामुळे एटीएम फोडीच्या घटनेची झळ पोलिसांना अधिक बसू लागली आहे. एटीएमच्या सुरक्षेबाबत बॅंकांना वारंवार सूचना देऊनही बॅंकानी सुरक्षेत कोणतीही सुधारणा केली नाही. कारवाई पोलिसांवर, बॅंका मात्र निवांत असल्याचे चित्र दिसत आहे.
गेल्या दोन वर्षांत एटीएम फोडण्याच्या 18 घटना घडल्या आहेत. गेल्या तीन महिन्यात हे प्रमाण वाढल्याने पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी रात्रगस्त वाढवली. रात्रगस्तीवरील कर्मचाऱ्यांना एटीएम सेंटरला भेट देण्याची जबाबदारी दिली. याशिवाय स्थानिक पोलिसांच्या मदतीला गुन्हे शाखेचे पोलिसही दिले. तरी देखील एटीएम फोडीच्या घटना सुरूच असल्याने आता पोलीस आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला आहे, पण केवळ पोलिसांवरच. एटीएम सुरक्षेच्या बाबतीतही काटकसर करणाऱ्या बॅंकांवर कोणतीही कारवाई केली नाही.
वाकड पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर एटीएम मशीन फोडताना आठ लाख रुपयांची रोकड जळाली. रात्रगस्तीवरील कर्मचारी डी. पी. कौलगे आणि बी. एच. टिंगरे यांनी “त्या’ एटीएमला भेट दिली नसल्याचे समोर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत पोलीस आयुक्तांनी टिंगरे आणि कौलगे यांना निलंबन केले.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतच 12 फेब्रुवारी रोजी रहाटणी येथे आणखी एक एटीएम चोरट्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने फोडून आतील 12 लाख 84 हजारांची रोकड चोरून नेली. “त्या’ रात्री गस्तीवर असणारे पोलीस उपनिरीक्षक आर. एस. मुदळ, कर्मचारी एम. डी. नारगे, एन. सी. जगताप यांनी त्या एटीएम सेंटरला भेट दिली नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. दरम्यानच्या काळात त्यांना अन्य काम लागल्याने ते एटीएमला भेट देऊ शकले नसल्याचा खुलासा त्यांनी वरिष्ठांकडे केला. मात्र रात्रभरात एकदाही वेळ मिळाला नाही का, असा जाब वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधितांना विचारला. सकाळी दहा वाजता नागरिकाने माहिती दिल्यावरच एटीएम फुटल्याचे पोलिसांना कळाले. यामुळे पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी उपनिरीक्षक मुदळ आणि कर्मचारी नारगे व जगताप यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न करण्याचे आदेश दिले आहेत.
पोलिसांवर कारवाई अन् बॅंका मात्र निवांत
पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व बॅंकेच्या व्यवस्थापकांची बैठक घेतली. एटीएमच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी सूचनाही केल्या. तसेच बॅंकांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही दिला. मात्र त्यानंतरही बॅंकांनी एटीएमच्या सुरक्षिततेबाबत काहीही उपाययोजना केली नाही. यामुळे एटीएम फोडण्याचे प्रकार सुरूच आहेत. अशा बॅंकांवर पोलिसांनी आयुक्तांनी कारवाई करण्याचे सोडून पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांना निलंबित व बदल्या करून कारवाई केली आहे. बॅंकांवर कारवाईचा इशारा मात्र पोकळ धमकी ठरल्याचे दिसून येत आहे.