“सेट’चा निकाल मार्च अखेरपर्यंत

सेट परीक्षार्थ्यांना निकालाची उत्सुकता

 

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यांत डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या “सेट’ परीक्षेचा निकाल मार्च अखेरपर्यंत जाहीर होणार असल्याची माहिती सेट विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सेट परीक्षार्थ्यांना निकालाची उत्सुकता निर्माण झाली आहे.

सहायक प्राध्यापकांसाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा अर्थात “सेट’ दि. 27 डिसेंबर 2020 रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेस 11 हजार 205 विद्यार्थ्यांनी एसईबीसी संवर्गातून परीक्षा अर्ज भरला.

मात्र, न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यामुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला. त्यानुसार 2 हजार 237 विद्यार्थ्यांनी “ईडब्ल्यूएस’ नुसार आमचा निकाल जाहीर करण्यास हरकत नसल्याचे सांगितले आहे. उर्वरित विद्यार्थ्यांचा समावेश खुल्या संवर्गात करून परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.

विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज भरला त्यावेळी एसईबीसी आरक्षण लागू होते. परंतु, पुढील काळात त्याला स्थगिती देण्यात आली. न्यायालयात यासंदर्भात सुनावणी सुरू आहे. परंतु, या परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांसमोर न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून एसईबीसीचा आणि ईडब्ल्यूएस आरक्षणाचा पर्याय दिला.

तसेच केवळ 715 विद्यार्थ्यांनी खुल्या संवर्गाचा पर्याय स्वीकारत असल्याचे सांगितले. तर, 2 हजार 237 विद्यार्थ्यांनी ईडब्लूएसचा पर्याय स्वीकारला. कोणताही पर्याय न कळवलेल्या उर्वरित सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आपोआपच खुल्या संवर्गात होणार आहे, असे सेट विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.