मुंबई – मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट असला, तरी राज्यात याचे सातत्याने पडसाद उमटत आहेत. विरोधी पक्ष भाजपाकडूनही सरकारला मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न केले जात आहेत. याच मुद्द्यावरून खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. महत्त्वाचे म्हणजे या पत्राची पत्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सदस्यांनाही पाठवण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी हे पत्र ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये “मराठा आरक्षण सुनावणी प्रश्नी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहिले. या पत्रामधून काही कायदेशीर व तांत्रिक बाबी स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न केला आहे. या पत्राची प्रत शरदचंद्रजी पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य यांनादेखील दिलेली आहे, असे संभाजीराजेंनी म्हटले आहे.