नवी दिल्ली – स्वातंत्र्य दिनानिमित्त इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या वीस जवानांना शौर्यासाठी विविध सेवा पदके प्रदान करण्यात आली आहेत. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडे यांनी सांगितले की, सहा पोलिस शौर्य पदके, विशिष्ट सेवेसाठी तीन राष्ट्रपती पोलीस पदके आणि गुणवंत सेवेसाठी 11 पोलीस पदके यांचा यात समावेश आहे.
शौर्य पदक प्रदान करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक कमांडंट (एसी) प्रभात मुकुल मार्टिन मिंज आणि अमित कुमार, सहाय्यक उपनिरीक्षक कुलदीप राज, हेड कॉन्स्टेबल हमेश कुमार आणि कॉन्स्टेबल ब्रह्म चंद्र आणि शक्ती कुमार यांचा समावेश आहे. त्यांना छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरुद्ध दोन स्वतंत्र मोहीमा यशस्वी केल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.
सुमारे 90,000 सुरक्षा जवानांची फौज असलेल्या या निमलष्करी दलावर चीनसोबतच्या 3,488 किमी लांबीच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे रक्षण करण्याची जबाबदारी आहे. नक्षलवादी मोहिमांच्यासाठी अनेक वेळा त्यांची मदत घेतली जाते.