लाहोर – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांना पुढील महिन्यात लंडनमधून परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा दावा पाकिस्तान ए तेहरीक ए इन्साफ पार्टीचे प्रमुख आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. नवाझ शरीफ यांना 2023 मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत भाग घेता यावा यासाठी त्यांच्यावरील आजीवन बंदी रद्द करण्यासाठी प्रशासनावर दबाव आणण्यात येत असल्याचा दावाही इम्रान खान यांनी केला आहे.
“पीएमएल-एन’ चे सर्वेसर्वा नवाझ शरीफ यांना पुढील महिन्यात लंडनवरून माघारी परत आणता यावे, याचसाठी “तोषखाना’ आणि बंदी असलेल्या व्यक्ती संस्थांकडून देणग्या प्रकरणी आपल्याला कायमचे अपात्र ठरवण्याचे कारस्थान केले जात आहे, असे इम्रान खान म्हणाले. काल रात्री लाहोरमधील हॉकी स्टेडियममध्ये झालेल्या “पीटीआय’ पक्षाच्या सभेदरम्यान ते बोलत होते.
नवाझ शरीफ यांना लंडनवरून परत आणण्याची तयारी जोरात सुरू केली गेली आहे. निवडणुकांपूर्वी त्यांना पाकिस्तानमध्ये परत आणले जाईल. त्यांच्या परत येण्याचा फायदा “पीएमएल-एन’पक्षाच्या प्रचारासाठी मोठा फायदा होईल, असे गृहमंत्री सनाउल्लाह यांच्या हवाल्याने इम्रान खान म्हणाले. नवाझ शरीफ लवकरच पाकिस्तानमध्ये परत येतील, असे पंतप्रधान शेहबाझ शरीफ हे देखील काही दिवसांपूर्वी म्हणाले होते.
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाकडून ऑक्टोबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. संसदेची मुदत संपण्याच्या एक वर्ष आगोदर या मुदतपूर्व निवडणुका होण्याची शक्यता आहे.