पिंपरी – चिंचवड येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालय हवेली क्रमांक 5 येथे सध्या सर्व्हर डाऊनची समस्या वाढली आहे. त्यामुळे दस्त नोंदणी करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना ताटकळत थांबावे लागत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत सह-दुय्यम निबंधक कार्यालयांतील दस्त नोंदणी थंडावली होती. 20 मार्चपासून सह-दुय्यम निबंधक कार्यालये बंद होती. त्यामुळे सदनिका, दुकाने आदींचे जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णत: ठप्प झाले होते. 19 मे पासून प्रतिबंधित क्षेत्रातील कार्यालये वगळता अन्य कार्यालये पूर्ववत सुरू झाली. अनलॉकची टप्पानिहाय अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर शहरातील सर्व 7 कार्यालये पूर्ववत सुरू झाली. चिंचवड येथील सह-दुय्यम निबंधक कार्यालयात सध्या दररोज 30 ते 40 दस्तांची नोंदणी होत आहे.
त्यातही येथील कार्यालयात गेल्या काही दिवसांपासून सतत सर्व्हर डाऊनची समस्या जाणवत आहे. त्यामुळे दर अर्ध्या तासाने एक दस्त नोंदणी अशी संथ गतीने प्रक्रिया सुरू आहे.
पर्यायाने, दस्त नोंदणीसाठी येणारे नागरिक, वकील आदींना ताटकळत थांबण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही. आज त्यामुळे चिंचवड येथील कार्यालयात दस्त नोंदणीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा देखील फज्जा उडवला होता.