पाकच्या ‘नापाक’ हरकती सुरूच; गोळीबारात पुन्हा 2 जवान शहीद

जम्मू – पाकिस्तानी सैनिकांनी सलग दुसऱ्या दिवशी शस्त्रसंधी भंगाची आगळीक करत शुक्रवारी भारतीय हद्दीत मारा केला. त्यामध्ये भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले. पाकिस्तानी सैनिकांनी नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत मारा केला. त्यांनी जम्मू-काश्‍मीरच्या राजौरी जिल्ह्यात भारतीय सीमा नाक्‍यांना लक्ष्य केले.

पाकिस्तानी बाजूकडून गोळीबार करण्यात आला. तसेच, तोफगोळे डागण्यात आले. त्या माऱ्यात दोन जवान गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्यांनी मृत्यूशी दिलेली झुंज अपुरी ठरली. नाईक प्रेमबहादूर खत्री आणि रायफलमन सुखबीर सिंग अशी वीरमरण आलेल्या जवानांची नावे आहेत. पाकिस्तानी माऱ्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.

एक दिवस आधीच (गुरूवार) पाकिस्तानी सैनिकांनी पूँच जिल्ह्यात गोळीबार आणि तोफगोळ्यांचा मारा केला. त्यामध्ये लष्कराचे सुभेदार स्वतंत्र सिंह यांना वीरमरण आले. त्याशिवाय, एक नागरिक जखमी झाला. पाकिस्तानी सैनिकांकडून वारंवार शस्त्रसंधीचा भंग केला जातो. त्या आगळिकींना भारतीय सुरक्षा दलांकडून जबर प्रत्युत्तर दिले जाते. त्यामध्ये पाकिस्तानची मोठी हानी होत असूनही त्या देशाला शहाणपण येत नसल्याचेच दिसते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.