मंचर – येथील उपजिल्हा रुग्णालयात करोना विलगीकरण (आयसोलेशन) कक्ष शुक्रवार (दि. 3) पासून सुरू करण्यात आला आहे. विलगीकरण कक्षात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी स्थानिक खासगी डॉक्टरांची मदत घेतली जाणार आहे, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील यांनी दिली.
मंचर उपजिल्हा रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटर विभागाच्या पहिल्या मजल्यावर हा कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे. करोना विलगीकरण कक्षात सुमारे 20 बेड तीन रूममध्ये असून बेडमधील अंतर दोन मीटरचे ठेवण्यात आले आहे. करोनाबाधित रुग्ण आहे किंवा नाही, याची तपासणी करून मगच त्यास या विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल.
मंचर शहरातील खासगी डॉक्टर आणि सरकारी रुग्णालयातील डॉक्टर यांच्या समन्वयाने करोना संशयित रुग्णाची तपासणी केली जाणार आहे. तालुक्यात एकही करोनाबाधित नाही; परंतु प्रत्येकाने घराबाहेर न पडता घरीच थांबावे, असे आवाहन गटविकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी केले आहे.
वडगाव काशिंबेग फाटा येथील खासगी भीमाशंकर हॉस्पिटल, घोडेगाव ग्रामीण रुग्णालय, निरगुडसर, धामणी, महाळुंगे पडवळ, तळेघर इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि खासगी डॉक्टर संयुक्तपणे करोना संशयित रुग्णाची वैद्यकीय तपासणी करतील. गरज भासल्यास त्यास विलगीकरण कक्षात दाखल केले जाईल.
-डॉ. सुरेश ढेकळे, तालुका वैद्यकीय अधिकारी