लाहोर – पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पोलिसांनी शनिवारी एक दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला आणि तालिबानच्या एका वरिष्ठ कमांडरसह ७ दहशतवाद्यांना अटक केली.
गुप्तचरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पंजाब प्रांतातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये छापे घालण्यात आले आणि ७ संशयित दहशतवाद्यांना शस्त्रास्त्रे, स्फोटके आणि अन्य घातक सामुग्रीसह अटक करण्यात आले, असे दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले.
तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानचा प्रमुख कमांडर हुस्नैन मोयाविया याला लाहोरपासून ४०० किलोमीटर अंतरावरील बहावलपूरमधून अटक करण्यात आली.
अटक करण्यात आलेले अन्य संशयित दहशतवादी हे तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तान, अल-कायदा आणि लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनांशी संबंधित आहेत.
या दहशतवाद्यांनी पंजाब प्रांतात घातपाती कारवाया करण्याचा कट केला होता. पोलिसांनी या दहशतवाद्यांना अज्ञात ठिकाणी हलवले असून पुढीलतपास सुरू केला आहे, असेही या प्रवक्त्याने सांगितले.