ज्येष्ठ नेत्यांचा मुलांसाठीचा आग्रह नडला – कार्यकारीणीत राहुल यांनी व्यक्त केली नाराजी

राहुल एकटेच मोदींच्या विरोधात लढत होते – प्रियांका

नवी दिल्ली – कॉंग्रेस कार्यकारीणीच्या काल झालेल्या सुमारे तासांच्या सभेत जी जोरदार चर्चा झाली त्यात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांवर ताशेरे झाडल्याची चर्चा आता रंगत आहे. राहुल गांधी यांनी या बैठकीत असे सांगितले की निवडणुकीच्या रिंगणात घराणेशाहीवर आरोप होत असताना पक्षाचे ज्येष्ठ नेते आपल्याच मुलांना तिकीट मिळावे यासाठी आग्रही राहीले. तर प्रियांका गांधी यांनी नमूद केले की पक्षाचे सारे ज्येष्ठ नेते हिरीरीने प्रचारात उतरले नाहीत, त्यांनी राहुल गांधींना मैदानात एकटेच सोडले. राहुल एकटेच मोदींच्या विरोधात लढत राहिले.

कॉंग्रेस कार्यकारीणीचा कालची बैठक पत्रकारांसाठी खुली नव्हती. त्यामुळे त्या बैठकीची आतली माहिती आज काहीं सूत्रांकडून खुली झाली. त्यानुसार राहुल आणि प्रियांका यांनी पक्षाच्या ज्येष्ठांवर जोरदार ताशेरे मारल्याचे स्पष्ट झाले. माझ्यानंतर गांधी घराण्यातील कोणीही कॉंग्रेसचे नेतृत्व करावे असे मला वाटत नाही असे नमूद करतानाच गांधी यांनी आपल्यानंतर प्रियांका गांधी यांच्याकडेही पक्षाचे नेतृत्व देण्यास साफ नकार दिला असेच सांगितले जात आहे. तसेच स्वता राहुल गांधी हे पक्षाध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर आपण ठाम आहोत असे संकेत त्यांनी या बैठकीत दिले. पक्षाच्या मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्ती आपल्या मुलाच्या तिकीटासाठी पक्षावर दबाव टाकून होत्या असेही राहुल यांनी यावेळी निदर्शनाला आणून दिले. प्रियांका गांधी यांचा तर यावेळी बोलताना किमान दोनदा मोठाच पारा चढला. पक्षाच्या पराभवाला जे कारणीभूत आहेत ते सर्व जण या खोलीतील बैठकीला उपस्थित आहेत असे त्या म्हणाल्या.

पक्षाला विजय मिळवून देणे ही जणू काही एकट्या राहुल यांचीच जबाबदारी असल्यासारखे पक्षातील ज्येष्ठ नेते वागत होते असे त्या म्हणाल्या. राहुल यांनी राजीनामा देऊ नये असे जेव्हा पक्षाचे ज्येष्ठ नेते म्हणाले त्यावेळी राहुल जेव्हा एकटे लढत होते त्यावेळी तुम्ही कोठे होतात असा सवाल प्रियांकानी केला.त्यांच्या या चढ्या आवाजातील मतप्रदर्शनानंतर बैठकीतील वातावरण तंग झाले होते.राफेल आणि चौकीदार चोर है या राहुल गांधी यांच्या प्रचाराच्या सूत्राला कोणीही पाठिंबा देण्यासाठी पुढे आले नाही असेही प्रियांकांनी यावेळी सुनावले. राहुल गांधी यांनी पी चिंदरबरम, कमलनाथ, आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांची नावे घेऊन त्यांनी आपल्या मुलांना पक्ष हिताच्या समोर पुढे केले अशी टिपण्णी राहुल यांनी केली. आपल्या मुलाला तिकीट दिले नाहीं तर पक्ष सोडून जाण्याची धमकी चिदंबरम यांनी दिली होती असेही राहुल यांनी निदर्शनाला आणून दिले. आपल्या मुलाला तिकीट मिळाले नाही तर आपण मुख्यमंत्रीपदी कसे राहू शकणार असा सवाल कमलनाथ यांनी आपल्याकडे व्यक्त केला होता असेही राहूल यांनी यावेळी सांगितले.

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत आपल्या मुलाच्या प्रचारासाठी सात दिवस जयपुर मध्येच तळ ठोकून होते. मुलासाठी त्यांनी साऱ्या राज्यातील कॉंग्रेस उमेदवारांकडे दुर्लक्ष केले असे ताशेरे त्यांनी त्यांचे नाव घेऊन मारले. नरेंद्र मोदींच्या विरोधात आपण जेव्हा भ्रष्टाचार प्रकरणावरून आवाज उठवत होंतो त्यावेळी पक्षाच्या नेत्यांनी हा विषय लाऊन धरला नाही ही निराशाजनक बाब आहे असेही ते म्हणाले.

अशी सगळी उदाहरणे देऊन राहुल यांनी आता आपल्या ऐवजी दुसरे कोणी पक्षाचे अध्यक्ष का होत नाही असा सवाल केला. त्यावेळी प्रियांका यांनी त्यांना मध्येच रोखले. त्या म्हणाल्या की तुम्ही अध्यक्ष पदावरून जावे हा भाजपचा ट्रॅप आहे त्या ट्रॅप मध्ये तुम्ही फसू नका. त्यांना हेच हवे आहे. पक्षाच्या पराभवाची जबाबदारी आपण घेत आहोत असे राहुल गांधी यांनी नमूद केले असले तरी त्यांनी पक्षाच्या अन्य नेत्यांवर मात्र प्रथमच जोरदार आगपाखड केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.