मंचर- येथील पराग डेअरी आणि सुलतानपुर येथील भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (दि. 1) भेट दिली. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.
बारामती येथे सेंटर ऑफ एक्सलन्स या शेतकऱ्यांच्या हितासाठी गाई, त्यांच्या पुढच्या जाती आणि त्यावरील संशोधन आणि न्यूट्रिशन यांच्यावर मोठा प्रोजेक्ट येत आहे. प्रॅक्टिकल अभ्यास दौरा म्हणून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पराग डेअरी आणि भाग्यलक्ष्मी डेअरी फार्म येथे भेट दिली. यावेळी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील, गोवर्धन दूध उद्योग समुहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णु हिंगे, प्रितम शहा, संजय मिश्रा, अरविंद देसाई आदी मान्यवर उपस्थित होते.
भारत सध्या दुधाच्या उत्पादनामध्ये आघाडीवर आहे, तर पुढील पाच वर्षांमध्ये जागतिक पातळीवर 50 टक्के दूध उत्पादन भारतात होणार आहे. दूध उत्पादन वाढीसाठी काय करता येईल, यासाठी दौरा करण्यात आल्याचे गोवर्धन दूध उद्योग समुहाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले. पुढच्या पाच ते दहा वर्षात शेतकऱ्यांनी काय करावे. त्याचे नियोजन होणार आहे. याचा जास्तीत जास्त फायदा भारतीय शेतकऱ्यांना होईल. यासाठी हा दौरा झाल्याचे प्रितम शहा यांनी सांगितले.