पुणे – अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामाईक प्रवेश परीक्षेसाठी (एमएचटी-सीईटी) यंदा
4 लाख 39 हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहे. गतवर्षीही सीईटीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 4 लाख 34 हजार इतकी होती. यंदाही तेवढ्याच संख्येने सीईटीसाठी अर्ज केल्याचे दिसून येत आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत केंद्रीय पद्धतीने व ऑनलाइनद्वारे ही प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या सीईटीसाठी नियमित शुल्कासह दि.7 जानेवारी ते 29 फेब्रुवारी कालावधीत अर्ज करण्याची मुदत होती. त्यानंतर विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. 1 ते 7 मार्च अशी मुदत होती. अर्ज करण्याची मुदत शनिवारी संपली. त्यानंतर आता अर्जाची संख्या 4 लाख 34 हजार 14 इतकी आहे, अशी माहिती सीईटी सेलकडून देण्यात आली. दरम्यान, एमएचटी-सीईटीसाठी यंदा एकूण 4 लाख 48 हजार 685 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी 9 हजार 671 विद्यार्थ्यांनी अर्ज पूर्णपणे भरलेला नाही.
दरम्यान, राज्य सीईटी सेलने सीईटी परीक्षेचे स्वरुप व गुणांची पद्धत प्रसिद्ध केली आहे. त्याचप्रमाणे परीक्षेचा कालावधीही निश्चित केला आहे. ही सर्व माहिती राज्य सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. परीक्षेला जाण्यापूर्वी ही माहिती व्यवस्थितपणे वाचून जावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
आता परीक्षेकडे लक्ष
आता अर्ज करण्याची मुदत संपली असून, आता विद्यार्थ्यांचे लक्ष सीईटीकडे लागले आहे. ही परीक्षा एप्रिल दरम्यान होत आहे. या परीक्षा ऑनलाइनद्वारे होणार आहेत. सीईटीसाठी 5 एप्रिलपासून हॉलतिकीट उपलब्ध करून दिले जाणार असून, विद्यार्थ्यांना 23 एप्रिलपर्यंत हॉलतिकीट डाउनलोड करता येईल, असेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे.