पुणे – पुण्यातील प्रख्यात व्यावसायिक अनिल मोतीचंद मेहता यांचे गुरूवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे येथील रत्ना हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. रात्री 1 वाजून 10 मिनिटांच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल मेहता यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली, जावई, नातू असा परिवार आहे. आज पहाटे वैकुंठ स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दैनिक “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांचे ते सासरे होत.
मूळचे बारामतीजवळील वडगाव येथील असलेल्या अनिल मेहता यांनी व्यवसायानिमित्त मुंबई गाठली. त्यानंतर ते पुण्यात आले व हीच त्यांनी आपली कर्मभूमी मानली. गिफ्ट आर्टिकल्सच्या व्यवसायात त्यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली. तसेच जोडीला व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या साहित्य सामग्रीचाही त्यांनी व्यवसाय केला. शांत आणि मनमिळाऊ स्वभाव हे त्यांचे वैशिष्ट्य असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्यांची घट्ट मैत्री जुळत असे व अखेरपर्यंत त्यांनी हे ऋणानुबंध जपले.
आपल्याकडे मदतीसाठी आलेल्या प्रत्येकाला मदत करण्याचा त्यांचा स्वभाव होता. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे त्यांनी सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. गरजवंताला योग्य ठिकाणी पाठवणे आणि त्याची गरज भागविणे या त्यांच्या स्वभावामुळे त्यांनी सगळ्यांना आपलेसे केले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबातील एक भक्कम आधार गमावल्याची भावना त्यांच्या निकटवर्तींयांनी आणि त्यांच्या स्नेहीजनांनी व्यक्त केली आहे.