इस्लामपूर – फेसबुकवरील स्वस्तात फर्निचर विक्रीच्या जाहिरातीला प्रतिसाद देणे बँक मॅनेजरच्या चांगलेच अंगलट आले. फेसबुकवरील अजितकुमार या भामट्याने तब्बल तीन लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी इस्लामपूर पोलिसांनी “त्या” भामट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. १८ ते २८ जुलैदरम्यान बँकेच्या खात्यात ऑनलाईन पैशाची मागणी करत फसवणूक झाली आहे. अवघ्या ४० हजारांच्या फर्निचरच्या हव्यासापोटी तब्बल तीन लाख भरलेच कसे हा कुतूहलाचा विषय आहे.
याबाबत गोपाल सिंग मीना (मूळ रा. खिरनी- राजस्थान सध्या इस्लामपूर ) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गोपाल सिंग मीना हे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये देवराष्ट्रे येथे बॅक मॅनेजर आहेत. त्यांनी फेसबुक वर स्वस्तात फर्निचर विक्रीसाठी उपलब्ध असल्याची जाहिरात पाहिली होती. तेव्हा फेसबुकवरील जाहिरातीत असणाऱ्या नंबरवर स्वतःचा मोबाईल नंबर शेअर केला. त्यावर अजितकुमार याने संपर्क साधला. आणि टीव्ही, सोपासेट, बेड, डायनींग, कपाट, एसी व टेबलसह हे सर्व फर्निचर अवघ्या ४० हजार रुपयांना विकायचे असल्याचे स्पष्ट केले.
हे साहित्य अवघ्या चाळीस हजार रुपयांना मिळणार म्हटल्यावर गोपाल मीना खुश झाले. त्यांना अजितकुमार याने हे साहित्य सीआयएसएफ ट्रान्सपोर्टने पाठवणार असल्याचे सांगितले. त्यासाठी ३ हजार १५० रुपये इमरान नावाच्या पेटीएम अकाउंट वर पाठवा असे सांगितले. तेव्हा १८ जुलैला मीना यांनी ही रक्कम पाठवली. त्यानंतर अजित कुमार याने ट्रान्सपोर्टची रिसीट व्हाट्सअप वर टाकली. तेव्हा त्या रीसीटवर लजीएसटीचे ९ हजार ९९९ लिहिले होते. सदरची जीएसटीचे पैसे पाठवण्यास भाग पाडले.
ठरलेल्या व्यवहारा पैकी १६ हजार ८५२ रुपयांची रक्कम सुरुवातीला पाठवली. त्यानंतर जीपीएसचे कारण सांगत एकवीस हजार ९९० रुपये मागितले. ते पुन्हा मीना यांनी दिलेल्या वेगळ्या खात्यात पाठवले. जीपीएस मॅच होत नाही म्हणून सिस्टिमचे स्वतंत्र चार्जेस आहेत ते तुम्हाला पाठवावे लागतील असे सांगत वेळोवेळी तीन लाख दोन हजार सातशे पाच रुपये इतकी रक्कम भामट्याने भरून घेतली. गोपाल मीना यांनी स्वतःच्या व त्यांच्या भावाच्या खात्यातून भामटा अजितकुमार व त्याने दिलेल्या वेगवेगळ्या खात्यात ही रक्कम ट्रान्स्फर केली होती.
त्यानंतर सामान आज येईल, उद्या येईल अशी वाट बघत गोपाल मीना बसले.पण सामान पोहचलेच नाही . २८ जुलैला अजित कुमार याने फोन केला. तुमचे सामान जिपीएस सिस्टिम लॉस झाल्यामुळे तुमचे पर्यंत पोहचू शकले नाही. तुमचे पैसे रिफंड करावयाचे आहेत. त्याची फाईल तयार असून त्याचे चार्जेस रुपये म्हणून तीन हजार रुपये पाठविणेस सांगीतले. गेलेले पैसे परत मिळतील या आशेने पुन्हा गोपाळ मीना यांनी दिलेल्या खात्यात पैसे पाठवीले . त्यानंतर पुन्हा अजित कुमारने पैसे मागितले. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर भामट्या अजित कुमारशी मोबाईल वर संपर्क साधला.
माझे पैसे मला परत करा असे वारंवार मागणी केली. तेव्हा त्याने पैसे परत करण्यास नकार दिला. फसवणूक झाल्याने मीना यांनी इस्लामपूर पोलीस ठाणे गाठत भामट्या विरोधात फिर्याद दिली आहे. पोलीस तपास करीत आहेत.