पुणे- केंद्र सरकारने 18 ते 59 वयोगटातील नागरिकांना करोना प्रतिबंधक लसीचा “बूस्टर’ डोस देण्याची घोषणा केली आहे. या वयोगटातील ज्यांचा दुसरा डोस घेऊन 9 महिने पूर्ण झाले आहेत, अशांना हा डोस मिळणार आहे. मात्र, आता हे डोस सरकारी केंद्रांत आणि तेही मोफत मिळणार नसून, ते खासगीमध्ये सशुल्क घ्यावे लागणार आहेत.
दोन दिवसांपूर्वीच ही सोय सुरू करण्यात आली आहे, परंतु खासगी रुग्णालयांची नावे कोविन ऍपवर अद्याप नोंदली न गेल्यामुळे तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. केंद्र सरकारने केवळ खासगी लसीकरण केंद्रांवरच 10 एप्रिलपासून सशुल्क “बूस्टर’ डोस देण्याची परवानगी दिली आहे. तर सरकारी केंद्रांवर 60 वर्षांपुढील नागरिकांनाच मोफत “बूस्टर’ डोस देण्यात येतो. मात्र, रविवारी 10 एप्रिल रोजी रविवार असल्याने बहुतांश खासगी लसीकरण केंद्र बंद होती. त्यामुळे अनेकांना लस मिळाली नाही.
असे आहेत आकडे
पुणे शहरात आतापर्यंत 38 लाख नागरिकांना लसीचा पहिला, तर 31 लाख नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर, 1 लाख 43 हजार जणांना तिसरा डोस देण्यात आला आहे. तिसऱ्या डोसपैकी 1 लाख 6 हजार जण हे 60 वर्षे व त्यावरील वयोगटातील आहेत. तर उरलेले 28 हजार हे आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाइन वर्कर आहेत.
को-विन ऍपमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाल्याने अनेक खासगी लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस मिळत नाही. मंगळवारपर्यंत या समस्येचे निराकरण होऊन नागरिकांना डोस मिळण्याची शक्यता आहे. सध्या शहरात
22 खासगी केंद्र आहेत.
– डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण अधिकारी, मनपा