पुणे – राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हवेच्या गुणवत्ता मोजणीसाठी नव्याने दोन यंत्र बसविण्यात येणार असून, यासाठी दोन जागांची निवड केली आहे. शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालय आणि चिंचवड येथे ही दोन्ही यंत्रे बसविणार आहे. यामुळे शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत सखोल अभ्यास करण्यासाठी मदत मिळणार असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले आहे.
नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एनकॅप) या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील पुणे शहराचा समावेश आहे. त्यामुळे या अभियानांतर्गत विविध उपक्रम राबविले जात आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या माध्यमातून हे उपक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमाच्या पहिल्या टप्प्यात शहरात चार नवीन गुणवत्ता मोजणी केंद्र बसविण्याचे काम हाती घेतले आहे. यापैकी दोन ठिकाणे निश्चित झाली असून यामध्ये शिवाजीनगर आणि चिंचवड यांचा समावेश आहे. तर लवकरच उर्वरित दोन ठिकाणेही निश्चित केली जाईल.
यापूर्वी शहरात सहा ठिकाणी गुणवत्ता मोजणी यंत्र बसवली आहेत. यामध्ये नळस्टॉप, कर्वेनगर, स्वारगेट, भोसरी, पिंपरी-चिंचवड या ठिकाणांचा समावेश आहे. या गुणवत्ता केंद्रतर्फे घेण्यात आलेल्या नोंदीचा “रिअल टाइम’ रिपोर्ट बोर्डाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतो. मात्र, ऑगस्टपासून हवेच्या प्रदूषणाबाबत कोणतीही माहिती संकेतस्थळावर उपलब्ध नाही.