पुणे – दोन दशकांपूर्वी विश्रांतवाडीमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळेची सुविधा नव्हती. त्यामुळे मुलांना भरमसाठ फी भरुन पुण्यातल्या शाळांमध्ये शिक्षण घ्यावे लागत होते. सर्वसामान्य गरीब कुटुंबातील मुलांना ही फी भरता येणे शक्य नसल्यामुळे बहुसंख्य मुले शिक्षणापासून वंचित राहत असत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन व पालकांच्या मागणीवरुन विश्रांतवाडी-मोहनवाडी येथे वर्ष 1999 मध्ये लक्ष्मण देवकर यांच्या इंद्रायणी शिक्षण संस्थेने एस. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल सुरु केली. या संस्थेच्या वाटचालीचा आढावा…
विश्रांतवाडी, कळस, प्रतिकनगर, मोहनवाडी भागातील मुलांना इंग्रजी माध्यमातील शिक्षण देण्याच्या उदात्त हेतूने नर्सरीच्या वर्गापासून शाळेची सुरुवात करण्यात आली. कालांतराने विद्यार्थी संख्या वाढत गेल्याने इयत्ता दहावीपर्यंत वर्ग वाढविण्यात आले. आता एकूण 1150 विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत. माफक फीमध्ये दर्जेदार शिक्षण देत विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास लक्ष्मण देवकर यांनी घेतला आहे. त्यामुळेच आयएसओ 9001 मानांकन मिळविता आले.