राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस अध्यक्ष वाकडकर यांची मागणी
पिंपरी – करोनाबाधित रुग्णांवरील उपचाराकरिता पंधरा दिवसांपासून शहरातील अनेक रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीत. काल शहरात उद्भवलेल्या ऑक्सिजन तुटवड्याची परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये, याकरिता पिंपरी चिंचवड, चाकण, तळेगाव औद्योगिक पट्ट्यातील अनेक कारखान्यांमध्ये असलेला ऑक्सिजन सिलिंडरचा अतिरिक्त साठा महापालिका प्रशासनाने ताब्यात घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी मनपा आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.
एमआयडीसीमधील अनेक कारखान्यांच्या उत्पादन प्रकल्पांमध्ये ऑक्सिजनचा वापर केला जातो. तर अत्यवस्थ करोनाबाधितांकरिता ऑक्सिजनची नितांत गरज भासत आहे. ऑक्सिजनची गळती झाल्याने नाशिकमधील रुग्णालयामधील 22 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. बुधवारी (दि.21 एप्रिल) रोजी पहाटे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक रुग्णालयांत ऑक्सिजनचा साठा संपत आल्यामुळे अनेक रुग्णांचा जीव धोक्यात आला होता.
मात्र काही महापालिका अधिकारी व लोक प्रतिनिधींच्या प्रयत्नांनंतर रुग्णालयांना ऑक्सिजन सिलिंडर मिळाल्याने अनर्थ टळला. अशी आणीबाणीची परिस्थिती निर्माण होण्यास कोण जबाबदार आहेत. याची चौकशी तज्ज्ञांच्या समिती मार्फत केली जावी. तसेच पुढील काळात अशी परिस्थिती उदभवू नये म्हणून नियंत्रण कक्षाव्दारे दर 24 तासाने ऑक्सिजनच्या उपलब्ध साठ्याची माहिती घेऊन त्याचे नियोजन करावे.
एमआयडीसीतील अनेक कारखान्यांनी त्यांच्या उत्पादनासाठी पुढील महिनाभराचा ऑक्सिजनचा अतिरिक्त साठा केला असण्याची शक्यता आहे. अर्थकारणाचे चाक असलेले औद्योगिक उत्पादन सुरळीत राहणे गरजेचे आहे. परंतु ऑक्सिजन अभावी एखाद्या रुग्णाचा जीव जाणे हे देखील गंभीर आणि चिंताजनक आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्यातील तरतुदींचा वापर करून, शहर भागातील औद्योगिक वापरासाठी असलेला ऑक्सिजन साठा आपण अधिग्रहित करू शकतो.
केंद्र सरकारनेही दिनांक 22 एप्रिल 2021 पासून बहुतेक उद्योगांना ऑक्सिजन वापरण्यास बंदी घातलेली आहे. शहरातील उद्योगांकडे असलेला ऑक्सिजन साठा सध्याच्या आणीबाणीच्या परिस्थितीत करोना बाधित रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. याची दखल आपण घ्यावी, अशी मागणी वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे.