अहमदाबाद, – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरातमधील गांधीनगर लोकसभा मतदारसंघात प्रदेश भाजपकडून क्रीडा स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. त्या स्पर्धांचे नामकरण कलम 370 वरून केले जाणार आहे.
युवकांना संधी मिळवून देण्याच्या उद्देशातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना त्यांच्या मतदारसंघांमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याची सूचना केली. त्यानुसार, शहांनी त्यांच्या मतदारसंघात क्रीडा स्पर्धा भरवण्यास सांगितले.
त्यामुळे आम्ही गांधीनगरमध्ये क्रिकेट आणि कबड्डी स्पर्धा घेणार आहोत. जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्दबातल ठरवण्यासाठी घटनेचे 370 वे कलम हटवण्यात आले. त्या प्रक्रियेत शहांचे योगदान महत्वाचे ठरले. गुजरातमधील आणि विशेषत: गांधीनगरमधील जनता कलम 370 या शब्दांच्या अक्षरश: प्रेमात आहे.
त्यामुळे क्रीडा स्पर्धांना प्रीमियर लीग 370 असे नाव देण्याचा निर्णय झाला आहे. त्याबाबतची घोषणा लवकरच होईल, अशी माहिती गुजरात भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. जम्मू-काश्मीरविषयीचे पाऊल तेथील बहुतांश राजकीय पक्षांना रूचलेले नाही. त्या पक्षांकडून विशेष राज्याचा दर्जा पुन्हा बहाल करण्याची जोरदार मागणी होत आहे. त्यामुळे शहांच्या मतदारसंघातील क्रीडा स्पर्धांच्या नावावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे.