सातारा – मांढरदेव येथील काळूबाई मंदिरात देणगी पेटीतील रक्कम मोजताना झालेल्या चोरी आणि अपहारप्रकरणी देवस्थान ट्रस्टचे सचिव रामदास खामकर व सहसचिव लक्ष्मण चोपडे यांना निलंबित करण्यात आले आहे. दरम्यान, देवीची पंधरा दिवसांवर आलेली यात्रा आणि त्याच्या नियोजनासाठी सचिवपदी सागर मोरे व सहसचिवपदी दादा कळंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मांढरदेव देवस्थानच्या दानपेटीची मोजणी करत असताना या कामी नेमण्यात आलेल्या निवृत्त बॅंक कर्मचाऱ्याने व सहसचिव लक्ष्मण चोपडे व एका कर्मचाऱ्याने एक लाख 64 हजार रुपयाची रक्कम व सोन्याचे दागिने लांबवल्याची तक्रार झाली होती. याप्रकरणी त्यांना अटक करून त्यांच्या घर झडतीमध्ये 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
पोलिस चौकशीत सचिव रामदास खामकर व शिपाई बळवंत ढेबे यांचे नाव पुढे आल्याने त्यांना अटक झाली होती. देवस्थान ट्रस्टच्या सोमवारी झालेल्या बैठकीत घडलेल्या प्रकाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली. या बैठकीत यात्रेच्या अनुषंगाने देवस्थान ट्रस्ट कर्मचारी सागर मोरे यांची सचिव तर दादा कळंबे यांची सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. रामदास खामकर आणि लक्ष्मण चोपडे यांना निलंबित करण्यात आले आहे. सध्या खामकर, चोपडे आणि ढेबे हे तीन कर्मचारी पोलीस कोठडीत आहेत. सोमवारी झालेल्या ट्रस्टच्या बैठकीला ट्रस्टचे अध्यक्ष अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश नंदीमठ, शासकीय विश्वस्त प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजीत भोसले व सर्व विश्वस्त उपस्थित होते.
दरम्यान, पोलीस कोठडीत असलेल्या रामदास कदम, लक्ष्मण चोपडे आणि बळवंत ढेबे यांच्या बॅंक खात्याची आणि त्यावरील व्यवहारांचा तपशील पोलिसांनी बॅंकांकडून, उपलब्ध संस्थांकडून मागविला आहे. संबंधितांनी आजपर्यंत देवस्थान ट्रस्ट येथील पैशांचा किती वेळा अपहार केला, कोणाच्या खात्यावर पैसे जमा केले, या खात्यावरून कोणाला रकमा देण्यात आल्या याबाबत तपास सुरु आहे. संबंधितांच्या बॅंक खात्याचा तपशील पोलिसांनी मागवला असल्याचे समजते.