पिंपरी-चिंचवड शहरात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव

16 रुग्णांचा मृत्यू सलग दुसऱ्या दिवशी दोनशेहून अधिक बाधित

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरासाठी ऑक्‍टोबरचे पंधरा दिवस आणि नोव्हेंबर महिन्याचे पहिले तीन आठवडे दिलासादायक ठरल्यानंतर मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाल्याचे समोर येत आहे. गेल्या दिवाळीनंतरच्या आठवडाभरात दीड हजारांहून अधिक बाधित झालेले असतानाच मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 16 जणांचा मृत्यू झाल्याने शहरात पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोनाचा पहिला रुग्ण 13 मार्च रोजी आढळून आला होता. यानंतर पहिल्या तीनच दिवसांत बाधितांचा आकडा 15हून अधिक झाला होता. यानंतर मार्चच्या शेवटच्या आठवड्यात पुन्हा करोनाने डोके वर काढले होते. प्रशासकीय पातळीवर प्रचंड खबरदारी घेतल्यानंतरही एप्रिल आणि मे मध्ये रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामध्ये जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मोठी वाढ झाली होती. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये शहरात दिवसाला एक हजारच्या सरासरीने रुग्ण वाढले होते. मात्र ऑक्‍टोबरच्या 15 तारखेनंतर बाधितांच्या संख्येमध्ये मोठी घसरण झाली होती.

नोव्हेंबर महिनाही शहरवासियांसाठी दिलासादायक ठरला. मात्र दिवाळीनंतर बाधित रुग्णांची संख्या पुन्हा मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. शंभरपेक्षा खाली गेलेला बाधितांचा आकडा पुन्हा सव्वादोनशेच्या सरासरीने वाढू लागला आहे. तर मृत्यूच्या आकड्यांमध्येही अचानकपणे वाढ होत आहे. प्रशासकीय पातळीवरील यंत्रणा सज्ज असली तरी रुग्णांची संख्या आटोक्‍यात ठेवणे हे मुश्‍किल बनण्याची शक्‍यता आहे. करोनाची कमी झालेली भीती, मास्क न वापरणे, सुरक्षित अंतर न ठेवणे या बाबी आकडा पुन्हा वाढण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातून सांगण्यात येत आहे.

239 जणांना बाधा
गुरुवारी (दि. 26) सायंकाळी चार वाजेपर्यंत शहरातील 231 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर शहराबाहेरील 8 जणांना करोनाची लागण झाली. आज दिवसभरात 16 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 13 व शहराबाहेरील 3 जणांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरामध्ये 91515 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 2281 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांमध्ये शहराबाहेरील 667 जणांचा समावेश आहे. शहरातील चिंचवड, काळेवाडी, पिंपरी, जुनी सांगवी, पिंपळे गुरव, तळवडे, दापोडी येथील 13 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील चाकण, देहूरोड, तळेगाव दाभाडे येथील तीन जणांचा मृत्यू झाला. आज दिवसभरात 85 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 87634 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3619 संशयित रुग्णांना महापालिकेच्या रुग्णालयामध्ये दाखल केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.