न्यूयॉर्क : एकीकडे जगभरात करोनाने हाहाकार घातला आहे. भारत, अमेरिकेसह ब्राझीललाही करोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. त्यात धक्कादायक म्हणजे करोनाची लस घेण्यास ब्राझीलच्या राष्ट्रपतीनींच नकार दिला आहे. “आपण करोनाची लस घेणार नाही. तो माझा अधिकार आहे,” असे खळबळजनक वक्तव्य ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी केले आहे.
ब्राझीलचे राष्ट्रपती जेअर बोलसोनारो यांनी केलेल्या विधानामुळे अनेकांना धक्का बसला आहे. बोलसोनारो यांनी यापूर्वीही अनेक वेळा करोनाच्या लसीकरण कार्यक्रमाबद्दल संशय व्यक्त करणारी वक्तव्यं केलेली आहेत. बोलसोनारो यांनी अनेक सोशल मीडियांवर थेट प्रक्षेपण सुरू असताना हे विधान केले आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी वृत्त दिले आहे.
“मी तुम्हाला सांगतोय, मी लस घेणार नाहीये. तो माझा अधिकार आहे,” असे जेअर बोलसोनारो यांनी म्हटले आहे. बोलसोनारो यांनी मास्क वापरण्याच्या उपयुक्ततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. “करोनाचा प्रसार रोखण्यात मास्क प्रभावी असल्याचे खूप कमी पुरावे आहेत. करोनावरील लस मुबलकप्रमाणात उपलब्ध झाल्यानंतरही मला लशीची गरज पडणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे. महत्त्वाचे म्हणजे बोलसोनारो यांना जुलैमध्येच करोना झाला होता.
जगभरात सध्या करोना लस निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अनेक कंपन्यांना लस निर्मितीत यश आले असून, अनेक लशींच्या शेवटच्या टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, ब्राझीलमध्ये करोनामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. जगात करोनामुळे सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत झाले असून, दुसऱ्या क्रमांकावर ब्राझील आहे. करोनाबाधितांची संख्याही ब्राझीलमध्ये मोठी आहे.