करोनाची जागतिक साथ सुरू झाली आणि अनेक ठिकाणी लॉकडाऊन झालं. साहजिकच ज्यांना शक्य होतं ते वर्क फ्रॉम होम करू लागले. त्यातल्या अडचणी किंवा किस्से समाजमाध्यमात व्हायरल होऊ लागले. पण आपल्या सर्वांचं काम इथे, या पृथ्वीवर असतं. ज्यांचं काम दुसऱ्या ग्रहावर आहे, त्यांचं काय?
लॉकडाऊन सुरू झालं आणि नासा जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरीतले सगळे जण घरून काम करायला लागले. आपल्या दिवाणखान्यात बसून मंगळावरच्या क्युरिऑसिटी रोव्हरचं नियंत्रण करायचं ही कल्पनाच अभूतपूर्व आहे. मात्र आज करोनाच्या काळात ही गरज निर्माण झाली आहे.
20 मार्चला आपली अत्यावश्यक उपकरणे आणि लॅपटॉप्स घेऊन ही टीम घरी गेली. अवघ्या दोन दिवसात त्यांनी आपली यंत्रणा वेगवेगळ्या ऍप्सच्या सहाय्याने पुन्हा उभी केली- मात्र यावेळी ती विकेंद्रित, वेगवेगळ्या घरांमधून विखुरलेली होती.
एरव्ही एकत्रितपणे एका लॅबमधून काम करणारे सगळे जण आता व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सतत संपर्कात असतात. 22 मार्चपासून त्यांनी पुन्हा क्युरिऑसिटी रोव्हरला नियंत्रित करायला सुरुवात केली. मंगळावरच्या एडिनबरा खडकाला ड्रिल करण्याचं काम त्यांनी ठरवल्याप्रमाणे पार पाडलं.
आपल्या सगळ्यांना घरून काम करताना ऑफिसची आठवण येते, तशी त्यांनाही येते. अर्थात याचं मुख्य कारण आहे ते त्यांच्या लॅबमधल्या अत्याधुनिक उपकरणांची. क्युरिऑसिटी रोव्हरला मंगळाचा पृष्ठभाग जसा दिसतो तसा अचूक दिसण्यासाठी नासाने खास बनवून घेतलेले थ्रीडी चष्मे ते वापरतात.
पृष्ठभागावरचा धुळीचा कण न कण दिसावा यासाठी अतिशय शक्तिशाली संगणक आणि जोडीला हे चष्मे यांच्या मदतीने ही टीम रोव्हरला काटेकोरपणे दिशा देऊ शकते. मात्र आता ते साध्या थ्रीडी चष्म्यावर भागवून घेत आहेत. एरव्ही ही टीम जगभरातल्या इतर शास्त्रज्ञांच्या सतत संपर्कात असते, तशी आताही आहे.
हे शास्त्रज्ञ देखील वर्क फ्रॉम होम करत असल्याने त्यांच्याकडेही सगळी उपकरणे वा गुंतागुंतीच्या यंत्रणा उपलब्ध नाहीत. काही वेळा इंटेरनेट कनेक्शनमध्ये अडचणी येतात, तर काही वेळा आवश्यक ते संदर्भ घरात हाताशी नसतात. त्यामुळे कामाच्या वेगावर परिणाम होतो आहे, तरी दर्जावर परिणाम होऊ नये याकडे हे सगळे पूर्ण लक्ष देत आहेत.
सदस्यांच्या वेगवेगळ्या वेळांशी जुळवून, त्यांच्या घरच्या अडचणी समजून घेऊन, आपापले स्क्रीन शेअर करत हे काम चाललं आहे. रोव्हरला सूचना देताना त्या आधी पूर्ण तपासून, त्यांची चाचणी करून, अख्ख्या टीमने निर्णय घेऊन मगच दिल्या जातात. आता वेगवेगळ्या ठिकाणांहून या सगळ्या चाचण्या होत आहेत. कोणतीही अवकाश मोहीम आखून पूर्ण करणे हे अतिशय किचकट, गुंतागुंतीचं काम असतं. मंगळावरचे रोव्हर दूरस्थ (रिमोट) पद्धतीने चालवणे यातही अनंत अडचणी असतात. म्हणूनच नासाने या वर्क फ्रॉम होमची बातमी देताना कोणत्याही अडचणींमधून आमची टीम मार्ग काढते याचं विशेष कौतुक केले आहे.
– मेघश्री दळवी