आपला चातुर्मास : सत्यनारायण कथेतील विज्ञान

-अरुण गोखले

पौराणिक कथा अनेकदा आपल्याला चमत्कार वाटतात! पण ते तसे नाही. आपल्याकडील कोणतीही गोष्ट शास्त्रास, विज्ञानास सोडून नाही. आता सत्यनारायणाच्या कथेत शास्त्र, विज्ञान काय याचा विचार करूया.

सत्यनारायण कथेच्या पहिल्या अध्यायात असे सांगितले आहे की, हे व्रत दु:ख, दारिद्य्र, शोक यांचा नाश करणारे असून धनधान्य, सुख-समृद्धी, समाधान आणि आनंद प्राप्त करून देणारे आहे. आपल्याला या गोष्टी मिळाव्यात म्हणून आणि अनेकदा मिळाल्या म्हणून ही पूजा केली जाते. यातील सुख आणि समाधान या दोन्ही गोष्टी मानसशास्त्राशी निगडीत आहेत. त्या सांगायच्या नाहीत तर अनुभूतीच्या पातळीवर अनुभवायच्या असतात. आनंद किंवा मानसिक समाधान किती मिळाले हे मोजमाप करून दाखविता येत नाही, पण ते मिळते हे नक्‍की.

दुसऱ्या कथेत लाकूडतोड्यास देव “तू जिथे गरीब लोक राहतात तिथे लाकडे विकायला न जाता श्रीमंत लोक राहतात तिकडे लाकडे विकायला जा’ असे सांगतो. तो तसेच करतो, त्याला जास्त पैसे मिळतात. हासुद्धा चमत्कार नाही तर त्या ठिकाणीही अर्थशास्त्राचा सिद्धांतच लागू पडतो. अर्थशास्त्र शिकविताना त्याचा एक मूळ सिद्धांत असा सांगितला जातो की, ज्या लोकांची खरेदी शक्‍ती जास्त आहे ते लोक एकच वस्तू जास्त किमतीस विकत घेतात. इथेही तोच सिद्धांत लागू पडतो.

तिसरी गोष्ट म्हणजे कलावती घरी जाऊन प्रसाद घेऊन येते आणि तिला तिच्या पतीची पाण्यात बुडणारी नाव सुरक्षित किनारी आल्याचे दिसते. तिला पतीची भेट होते. या गोष्टीचाही बारकाईने विचार केला तर ही घटनासुद्धा शरीरशास्त्र आणि मेडिकल सायन्सकडेच जाते. ती मुलगी काहीही न खातापिता जेव्हा धावत येते तेव्हा तिच्या डोळ्यापुढे अंधारी येते. तिला पतीची नाव डुबतेय असे दिसू लागते. हा तिच्या शरीरातील उसळलेल्या पित्ताचा परिणाम नव्हे काय! कारण सकाळी उपाशीपोटी धावपळ केली तर काही व्यक्‍तींना चटकन चक्‍कर येते. अशी चक्‍कर छोट्याशा गोळीने, साखरपाण्याने जर थांबते तर तिथे तिने प्रसाद खाल्ल्यावर तिची चक्‍कर थांबली. तिला सर्व काही नीट दिसू लागले, असे मानण्यास काय हरकत आहे. आपणच जर या कथांकडे अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर ते उचित ठरणार.

Leave A Reply

Your email address will not be published.