– डॉ. मेघश्री दळवी
वेग आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी एआयचे (आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचे) उपयोग विस्तारत चालले आहेत. सोबत अनेक नावीन्यपूर्ण कल्पनांसाठी एआयची मदत होऊ शकते. आता प्राण्यांची भाषा समजून घेण्यासाठी एआयचा वापर करण्याचे अनोखे प्रयोग होत आहेत. प्राणी एकमेकांशी कसा संवाद साधतात याविषयी माणसाला दीर्घकाळ कुतूहल आहे. अनेक शास्त्रज्ञांनी प्राण्यांच्या सोबत राहून यावर पायाभूत संशोधन केलं. आता त्यात एआयची साथ मिळणार आहे.
दक्षिण पॅसिफिक समुद्रातल्या न्यू कॅलिडोनियन कावळ्यांच्या काही प्रजाती वेगवेगळ्या सामाजिक गटांमध्ये राहतात. फांदीचा हुक करून किडे उचलण्यासारख्या त्यांच्या काही सवयी शास्त्रज्ञांना खास वाटतात. हे कावळे साधनं बनवण्याचं तंत्र इतरांना किंवा पुढील पिढ्यांना कशा प्रकारे देत असतील, याचा अभ्यास त्यांना करायचा आहे. बेटावर कावळ्यांचे वेगवेगळे गट आहेत, त्यांचे स्वरही वेगळे आहे हे या अभ्यासकांनी निश्चित केलं आहे. मग त्या वेगवेगळ्या बोली असतील का, त्यातून सांस्कृतिक फरक स्पष्ट होऊ शकेल का, या शंकांचं त्यांना निरसन करून घ्यायचं आहे.
त्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये काम करणारे शास्त्रज्ञ आणि जीवशास्त्रज्ञांची एक टीम कावळ्यांच्या संवादाविषयी डेटा गोळा करत आहे. त्याच वेळी एआयच्या मदतीने या डेटाचं विश्लेषण करण्यासाठी मॉडेल तयार होत आहे. काही वेळा आपल्याकडे भरपूर डेटा असतो, पण त्यातले विशिष्ट पॅटर्न्स आपल्याला दिसत नाहीत. कॉम्प्युटरच्या मदतीने काही उलगडले तरी न दिसणारे काही पॅटर्न्स राहतातच. शक्तिशाली एआय प्रणाली मात्र असे पॅटर्न्स शोधून काढू शकते, संशोधनाला नवी दिशा देऊ शकते. याचाच वापर या प्रकल्पात होणार आहे. प्राणी आणि पक्षी आपल्याला अशा अभ्यासातून नीट समजतील असं मत या प्रकल्पातील अझारस्कीन या शास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.
दुसरीकडे स्पर्मव्हेल विषयक संशोधन करणारे शास्त्रज्ञ शेन गेरो गेली 20 वर्षे त्यांचे आवाज समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. कॅरिबियन समुद्रातील स्पर्मव्हेलच्या दोन गटांच्या तपशीलवार नोंदी त्यांच्याकडे आहेत. स्पर्मव्हेलची क्लिक-क्लिक आणि त्या क्षणीची कृती यात काय संबंध असेल यावर त्यांचा अभ्यास सुरू आहे. हे व्हेल्स एकमेकांना ओळखण्यासाठी विशिष्ट ध्वनी वापरतात. आपण नावाने हाक मारतो तसे. गेरो आणि त्यांचे सहकारी नोंदीवरून व्हेल्सच्या आवाजांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत आहेत.
त्यातून व्हेल्सची भाषा शिकण्याची त्यांची आकांक्षा आहे. अलीकडे त्यांनी त्यासाठी एआय वापरून पाहिलं, आणि त्यांच्या प्रयोगाला चांगलं यश मिळालं. त्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात एआय वापरायची तयारी सुरू केली आहे. याच दिशेने आणखी काही प्रयोग सुरू आहेत. प्राण्यांची भाषा अवगत झाली तर त्यांच्याशी संवाद साधता येईल आणि त्यातून पर्यावरणीय संतुलन साधता येईल, असा या सर्व तज्ज्ञांचा विश्वास आहे.