लोणंद – खंडाळा तालुक्यातील वाठार कॉलनी येथील वाठार हायस्कूलची मुले शाळेत घेऊन जात असलेल्या स्कूल व्हॅनने अचानक पेट घेतल्याची घटना लोणंद- शिरवळ रस्त्यावरील शेडगेवाडी फाट्याजवळ शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. ही स्कूल व्हॅन गॅसवर चालवली जात असल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली. या व्हॅनमध्ये शेडगेवाडी येथील दहा ते बारा विद्यार्थी प्रवास करत होते. व्हॅनने शेडगेवाडी फाट्याजवळ आल्यानंतर अचानक पेट घेतला. त्यानंतर प्रसंगावधान राखून नवनाथ कराड या चालकाने सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढले. मात्र, या आगीत स्कूल व्हॅन संपूर्ण जळून खाक झाली आहे.
या स्कूल व्हॅनचा चालक नवनाथ कराड वाठार कॉलनी येथील वाठार हायस्कूलचाच शिपाई असल्याचे समजते. तो विद्यार्थ्यांना दररोजच या वाहनाने शाळेत आणत व घरी सोडत होता. या व्हॅनमध्ये सुरक्षिततेसाठी अग्निशमन यंत्र ठेवले नसल्याने आग आटोक्यात आणता आली नाही. या अपघाताने स्कूल व्हॅनच्या सुरक्षिततेचा आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अपघाताबाबत वाठार हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहिते यांना विचारले असता त्यांनी शाळेचा आणि त्या स्कूल व्हॅनचा कसलाच संबंध नाही. या व्हॅन चालक शिपायास विद्यार्थ्यांच्या पालकांनी संमतीने मुले शाळेतून ने आण करण्यासाठी परवानगी दिली होती.
त्यासाठी ठराविक रक्कम त्या शिपायास पालकांकडून दिली जात होती असे स्पष्टीकरण दिले आहे. तर याबाबत खंडाळ्याच्या गटशिक्षणाधिकारी सुजाता जाधव यांना विचारणा केली असता त्यांनी या शाळेच्या मुख्याध्यापकांकडून अहवाल मागवण्यात आलेला असून चालक त्या संस्थेचा कर्मचारी असल्याचे माहित नसल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भात सोमवारी अधिक माहिती घेऊन त्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. या अपघाताबाबत लोणंद पोलीस ठाण्यात संध्याकाळपर्यंत कसलीही नोंद करण्यात आलेली नाही.