मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्प्यात मतदान पार पडले असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी पार पडणार आहे. त्यानंतर चौथा आणि पाचवा टप्पा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात देशाची आर्थिक राजधानी मुंबईत मतदान पार पडणार आहे.
सध्या मुंबईतील लोकसभेच्या सहाही जागेवरील महाविकास आघाडी आणि महायुतीचे उमेदवार आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. विशेष म्हणजे पहिल्या दोन टप्प्यात मतदानाचा टक्का कमी राहिला. त्यामुळे प्रशासनाकडून विविध सवलत आणि जाहिरातींच्या माध्यमातून मतदारांना मतदान करण्यासाठी आकर्षित करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. अशीच सवलत मुंबई मेट्रो प्रशासाने प्रवाशांना दिली आहे.
लोकसभा निवडणूक 2024च्या पाचव्या टप्प्यातील मतदान मुंबईत होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाने प्रवाशांना विशेष सवलत दिली आहे. त्यानुसार, मुंबई मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 च्या सर्व प्रवाशांना 20 मे 2024 रोजी प्रवासी तिकिटावर म्हणजेच मूळ तिकिटदरावर 10 टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे.