पुणे – महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी यांच्या वतीने आयोजित व इंडियन ऑईल यांनी प्रायोजित केलेल्या ६७ व्या शालेय राष्ट्रीय स्क्वॉश स्पर्धेत मुलींच्या गटात इशिका खंडेलवाल, रिया कासार, छवी पांचाळ, अनायरा मेहता यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
उंड्री येथील संपूर्णपणे काचेच्या महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीच्या कोर्टवर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत मध्यप्रदेशच्या इशिका खंडेलवालने छत्तीसगडच्या हेमल झुनझुनवालाचा ११-२, ११-० असा तर, सीबीएससी बोर्ड महाराष्ट्राच्या रिया कासार हिने गुजरातच्या हीर पाडालियाचा १२-१०, ११-४ असा पराभव केला. सीबीएससी च्या ऋत्विका बुंदेलाने गुजरातच्या अन्या नागपालचा ११-१, ११-० असा सहज पराभव केला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात पहिल्या फेरीत आयबीएसएसओच्या छवी पांचालने मध्यप्रदेशच्या खुशी सक्सेनाचे आव्हान ११-६, ११-० असे मोडीत काढले. चुरशीच्या लढतीत अनायरा मेहताने मध्यप्रदेशच्या शुभी गुप्ताचा ७-११, १६-१४, १२-१० असा संघर्षपूर्ण पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचे उदघाटन आयओसीएलच्या रिटेल सेल्सचे (पश्चिम दक्षिण) कार्यकारी संचालक नीरज अहलूवालीया, महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष प्रदीर खांडरे, विभागीय क्रीडा उपसंचालक अनिल चोरमले, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमओएचे सहसचिव दयानंद कुमार, पुणे जिल्हा स्क्वॉश संघटनेचे सचिव आनंद लाहोटी, इंडीयन ऑईलचे मयंक गुप्ता, कालिदास मगर, शिवाजी कोळी, सतीश पोतदार, नकुल चव्हाण, संदीप पारेख, सुरेंद्र करवा व हृषिकेश बजाज आदी उपस्थित होते.