बिहारमध्ये येत्या 4 वर्षांत दारूबंदी
पाटणा, दि. 10 – केंद्र सरकारचा दारूबंदीचा कार्यक्रम येत्या 4 वर्षांत अमलात येईल असे बिहार सरकारने जाहीर केले आहे. या वर्षी 25 टक्के दारू दुकाने बंद करण्यात येतील व नंतरच्या तीन वर्षांत बाकीची दारू दुकाने बंद करण्यात येतील.
नभोवाणी प्रसारणास 50 वर्षे पूर्ण
मद्रास – देशातील नभोवाणी प्रसारणास 50 वर्षे पूर्ण झाली. सध्या देशात आकाशवाणीची 83 केंद्रे असून 17 दशलक्ष परवानाधारक रेडिओ सेट आहे. जगातील हे सर्वात मोठे आकाशवाणीचे जाळे आहे.
फ्रान्स पाकला अणुइंधन पुरविणार नाही
पॅरिस – पाकिस्तानला अणुइंधन पुरविण्याचा करार फ्रान्सने केला होता. पण त्या कराराबाबत वाद निर्माण झाल्यामुळे तो करार आता बदलण्याचे फ्रान्सने ठरविले आहे. अणुशास्त्र प्रसारामुळे उद्भवणारे संकट टाळण्यासाठी फ्रान्सने हा निर्णय घेतला आहे.
‘सम्राट अशोका’चे 5 टन वजनाचे अवशेष मिळाले
मुंबई – अपघात झालेल्या जंबो जेट ‘सम्राट अशोका’चे सुमारे 5 टन वजनाचे भाग नाविक पाणबुड्यांनी समुद्रातून बाहेर काढले आहेत. 60 पाणबुडे 24 तास हे काम करीत आहेत.