एर्नाकुलम – करोनाच्या साथीनंतर तब्बल दीड वर्षांच्या खंडानंतर शाळा सुरू होत असताना केरळमधील एका शाळेने गणवेशाबाबत इतिहास निर्माण केला आहे. या शाळेतील मुलींसाठी आणि मुलांसाठी गुढघ्यापर्यंत लांब विजार आणि शर्ट असा लिंगभेद नसणारा गणवेश लागू केला आहे.
एर्नाकुलम जिल्ह्यातील पेरम्बावूर जवळ असणाऱ्या वलयांचिरंगारा शासकीय प्राथमिक शाळेतील 745 विद्यार्थी आणि विद्यार्थीनी लिंगभेद नसणारा गणवेश घालून शाळेत येऊ लागले आहेत. केरळ सरकारनेही अशा प्रकारच्या गणवेशाला पाठिंबा व्यक्त केला आहे. गुडघ्यापर्यंतची थ्री-फोर्थ प्रकारातील विजार आणि शर्ट असा गणवेश लागू करण्याचे नियोजन शाळेने 2018 मध्येच केले होते.
आता करोनाच्या साथीनंतर शाळा प्रत्यक्ष सुरू झाल्याने नव्या प्रकारचा गणवेश घालून मुले-मुली शाळेत येऊ लागली आहेत. शाळेच्या पालकसंघाचे सदस्य व्ही. विवेक यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाले की, सर्वांना एकाच प्रकारे सगळ्या गोष्टींचा आनंद घेता यावा यासाठी पालक संघाने 2018 मध्ये हा निर्णय घेतला होता. त्याला सर्व पालकांचे आणि मुला-मुलींचे पाठबळ मिळाले. 2018 मध्ये पूर्व प्राथमिक वर्गातील 200 विद्यार्थ्यांसाठी हा गणवेश लागू करण्यात आला होता. त्यानंतर आता शाळेतील सर्वांसाठी लिंगभेद विरहीत गणवेश लागू करण्यात आला आहे.
शिक्षणमंत्री व्ही. सिवानकुट्टी यांनी याबद्दल शाळेचे कौतुक केले आहे. लिंगभेद टाळून सर्वसमावेशकतेच्या दिशेने पावले टाकणाऱ्या उपक्रमांना सरकारकडून प्रोत्साहन देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. मुले आणि मुलींसाठी वेगवेगळ्या शाळा असाव्यात का, याबाबतही समाजात चर्चा व्हायला हवी असे त्यांनी म्हटले आहे.
नव्या गणवेशाबाबत मुलांमध्ये उत्साह आणि कुतूहल असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका के. पी. सुमा यांनी सांगितले. नव्या गणवेशात क्रीडा व अन्य उपक्रमांमध्ये सहभागी होताना मुली अधिक आत्मविश्वासाने आणि निर्धास्तपणे वावरू शकतील असे त्यांनी म्हटले आहे.