ढाका – बांगलादेशच्या शिक्षण मंत्रालयाने करोना साथीच्या पार्श्वभूमीवर 28 फेब्रुवारीपर्यंत शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तथापि, क्वामी मदरसे खुले राहतील. बांगलादेशात पहिला करोना पॉझिटिव्ह 18 मार्च रोजी आढळला होता. त्यानंतर देशातील शाळा आणि इतर शैक्षणिक संस्था बंद राहिल्या आहेत. उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा यापूर्वीच रद्द करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशातील कोविड 19 विरोधातील लसीकरण कार्यक्रम जोरात सुरू आहे. लसीकरण कार्यक्रमास पटकन लोकप्रियता मिळाली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसच्या म्हणण्यानुसार 27 जानेवारीपासून आतापर्यंत देशात 7.36 लाखाहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे. देशभरात 7 फेब्रुवारीपासूनमोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम सुरू झाला. शनिवारी देशातील 1005 आरोग्य केंद्रांवर 1.9 लाख लोकांना लस देण्यात आली.
ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी ऍस्ट्रॅजेनेका लसीचे 30 दशलक्ष डोस खरेदीसाठी बांगलादेशने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. त्यापैकी मागील महिन्यात 5 दशलक्ष डोस बांगलादेशात दाखल झाले. बांगलादेशला 2 दशलक्ष डोस भारताने भेट म्हणून दिले आहेत.