बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी विद्यार्थ्यांची झुंबड
सातारा – गेल्या पंधरा दिवसांत शहरातील सीबीएससी पॅटर्नच्या शाळा सुरू झाल्या असल्या तरी साताऱ्यात मराठी आणि इंग्रजी माध्यमातील बहुतांश शाळा 17 जूनपासून सुरू होत आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये लगबग सुरू आहे. मौती चौक ते पंचमुखी गणपती परिसर विद्यार्थ्यांच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी होऊ लागली आहे. मुलांसाठी शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांची धावपळ यामुळे राजवाडा परिसर वाहतूक कोंडीने दमला आहे. युनिफॉर्म, दप्तर, वह्या पुस्तकांबरोबर टिफिन बॉक्स, वॉटर बॅग्ज खरेदी मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या आठवड्यापासून शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी स्टेशनरीच्या दुकानांमध्ये मोठी गर्दी होत आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय वस्तूंमध्ये अनेक व्हरायटी आल्या आहेत. आकर्षक कंपास कीट, बॅग मुलांच्या पसंतीला उतरत आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 5 ते 10 टक्के दरवाढ झाली आहे.
स्कूल ड्रेस
शहरातील इंग्रजी आणि मराठी माध्यमांच्या शाळांचे ड्रेस सध्या बाजारातील ठराविक दुकानांमध्ये, शो-रूम्समध्ये झळकत आहेत. इंग्रजी शाळांकडे वाढता कल लक्षात घेऊन त्यांच्या ड्रेसकोडचे अनुकरण येथील मराठी शाळांनीही केले. अनेक शाळांचे रंगीबेरंगी शर्ट, पॅंटचे सेट तयार आहेत. शहरातील सेंट झेवियर्स हायस्कूल, होलीक्रॉस स्कूल, विद्यापीठ हायस्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, ड्रेएमएलजीसह अन्य शाळांचेही ड्रेसकोड बाजारात आहेत. काही इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी यादिवशी टी-शर्ट हा ड्रेसकोड केला आहे. ड्रेसकोडमध्ये बेल्ट, स्वेटरचाही समावेश आहे. अनेक शाळांच्या ड्रेसमध्ये निळ्या स्वेटरचा समावेश असतो. स्वेटर आणि शर्टवर शाळेचा लोगोही असतो. मात्र काही शाळांचे ड्रेस ठराविक दुकानांमध्येच उपलब्ध आहेत.
कंपास कीट
मुलांसाठी लागणारे पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, स्केल असे एकत्रित साहित्याचे कीट अनेक दुकानांमध्ये, मॉलमध्ये दिसून येत आहे. विद्यार्थ्यांनी अशा कीटला अधिक पसंती असल्याचे दिसून येत आहे. अर्धा डझन पेन्सिल, खोडरबर, शार्पनर, प्लास्टिक पट्टी अशा साहित्याचे बेसिक कीट सर्वत्र उपलब्ध आहे. यातही वेगळेपण आणण्याचा प्रयत्न विक्रेत्यांनी केला आहे. काही कीटमध्ये गडद रंगाच्या पेन्सिल असतात. काही कंपन्यांनी अशी कीट बाजारात आणली आहे. याची किंमत 50 पासून साडेतीनशे रुपयापर्यंत आहे.
स्कूल बॅग
मुलांना टेडी बॅग, फॅन्सी बॅगचे आकर्षण टिकून आहे. अगदी 250 रुपयांपासून ते 1500 रुपयांपर्यंतच्या बॅग बाजारात उपलब्ध असल्यामुळे खरेदीसाठी गर्दी होत आहे. बाजारात कोड मेटिंग, नायलॉन, फर, कमी वजनाच्या आणि टिकाऊ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग लक्ष वेधून घेत आहेत. निंजा, छोटा भीम, मंकी, बार्बी या स्कूलबॅगची मोठ्या प्रमाणात चलती आहे. पावसात न भिजणारी, लवकर न फाटणारी, टिकाऊ आणि प्रत्येक मोसमात वापरता येतील अशा बॅगही विक्रेत्यांनी उपलब्ध केल्या आहेत.