मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी दुपारी पार पडली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत राममंदिर आणि शिवजयंतीनिमित्त आनंदाचा शिधा मोफत देण्यासह विविध निर्णय घेण्यात आले.
मुख्यमंत्री सचिवालयाने याबाबत माहिती दिली आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्याच्या दिवशी देशात दिवाळी साजरे करण्याचे आवाहन पीएम मोदींनी केले होते.
याच अनुषंगाने राज्यातील सुमारे दीड कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत एक किलो रवा, एक किलो चणाडाळ, एक किलो साखर आणि एक लिटर पामतेल देण्यात येईल. राज्य मंत्रिमंडळाच्या इतरही बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय झाले.
बैठकीतील इतर निर्णय
राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित (एसएएम) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता
ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
शासकिय लेख्यातून आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती
महात्मा फुलेंच्या जीवनावरील सत्यशोधक मराठी चित्रपट राज्यात टॅक्स फ्री
जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन लागू
पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत लाभर्थ्यांचे अनुदान रु.५० हजारांवरून एक लाखांवर
महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियमनुसार नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज
राज्यात न्यायिक अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ आणि ११०६४ सहाय्यभूत पदे निर्माण करण्यास तसेच ५८०३ पदे बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन घेण्यास मंजुरी