संशयिताला अटक; तालुका पोलिसांची कारवाई
सातारा – धावडशी (ता. सातारा) येथील शेतमजूर शालिवान जयसिंग पवार (वय 33) याचा कळंबे येथील शिवारात गुरुवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास मित्रानेच डोक्यात टिकाव घालून खून केला. याप्रकरणी अनिल तुकाराम पवार (रा. मकनपुर लमाण तांडा,कर्नाटक, सध्या राहणार नेले ता. सातारा) याला सातारा तालुका पोलीसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शालिवान पवार कळंबे येथील सचिन धर्माजी पवार यांच्या शिवारात संशयितासोबत शेताच्या बांधावरील चेंबरसाठी खड्डा काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, शालिवान आणि अनिल टिकावाच्या साह्याने खड्डा खोदत होते. शिवी दिल्याच्या किरकोळ कारणावरून शालिवानचा अनिलशी वाद झाला होता. त्या भांडणाच्या रागात अनिलने टिकावाने शालिवानच्या डोक्यात, मानेवर घाव घातले. यामध्ये शालिवान याचा जागीच मृत्यू झाला. परिसरातील शेतकऱ्यांना ही घटना कळताच त्यांनी फोनवरून पवार यांच्या नातेवाईकास माहिती कळवली.
शेतामधे शालिवान हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असताना घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. सातारा तालुका पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अनिल पवार याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला. अनिल याला अटक करण्यासाठी सातारा तालुका पोलिसांची दोन पथके त्याच्या राहाण्याच्या ठिकाणी गेली होती, मात्र अंधाराचा फायदा घेऊन अनिल फरारी झाला होता. अनिल म्हसवे गावच्या हद्दीत डोंगरात लपून बसल्याची माहिती शुक्रवारी सकाळी तालुका पोलीसांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलीसांनी डोंगराला वेढा घालून अनिलला ताब्यात घेतले. त्यानंतर अनिल यास पोलीस ठाण्यात आणले. त्याने खुनाची कबुली दिल्याने त्याला उद्या सातारा न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती तालुका पोलीसांनी दिली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शाळीग्राम, उपनिरीक्षक नारायण गिते, सहाय्यक उपनिरीक्षक उत्तम कोळी, वाकडे, हवालदार राजू मुलाणी, परिहार, मराडे, पोलीस नाईक सुजीत भोसले, सुहास पवार, पोळ, संदीप कुंभार, रमेश चव्हाण, मिथुन मोरे यांनी केली. संशयिताच्या अवघ्या चोवीस तासांत मुसक्या आवळल्याप्रकरणी तालुका पोलीसांचे जिल्हा पोलीस अधीक्षकप्रमुख तेजस्वी सातपुते, अप्पर अधीक्षक धीरज पाटील यांनी अभिनंदन केले. पुढील तपास पोलीस निरीक्षक
आण्णासाहेब मांजरे करत आहेत.