सत्पात्री दान

मागील लेखात आपण दान आणि भीक यातला फरक पाहिला. त्यामुळे भीक देऊ नयेच पण दान सुद्धा कोणाला द्यावं? आपण दिलेलं दान सत्पात्री पडलं आहे की नाही याची खातरजमा करायलाच हवी. कारण समुद्रात आणखी एका थेंबाची भर टाकून जसा काही उपयोग नसतो. तसंच दगडावर बी रोवण्यात सुद्धा कोणतेही शहाणपण नसते. फाटक्‍या झोळीत टाकलेलं दान सत्पात्री पडलं असं कसं म्हणता येईल? मागे एक भिकारी मरण पावला आणि त्याच्या बॅंक खात्यात लक्षावधीची माया आढळून आली. घरात सुद्धा पोत्याने चिल्लरचा खुर्दा सापडला. सर्व माध्यमांनी या गोष्टीची दखल घेतली. गरजवंताची गरज भागवायची म्हणून अथवा पुण्य गाठीला बांधावं म्हणून त्या भिकाऱ्याला भीक देणाऱ्या दात्यांची भीक सत्पात्री पडली का? नक्कीच नाही. पण यातून आपण उगाच जाता येता कुणाच्याही हाती भीक घालू नये एवढे शहाणपण कितीजणांना आले असेल.

बहुतेक प्रवासी गाड्यांमध्ये तृतीयपंथी भेटतातच. परवा तर आमच्या सोसायटीत आला होता. वॉचमनला म्हटलं, “त्याला का आत येऊ दिलं.’ तर वॉचमन म्हणाला, “साहेब ऐकंणाच की, मी न्हायी म्हणलो तर ते माझ्याच अंगावर यायलं टाळ्या वाजवत. मग काय करू तर.’ मी त्याला घालवून द्यावं म्हणून घरातून बाहेर निघालो. तर बायकोनं आडवलं. म्हणाली, “नका लागू त्याच्या नादी. काहीही घाणेरडं बोलतात ते. ते बोलतील ते खरं होतं. त्यांचा शाप लागू होतो.’ त्यांच्या शापाची भीती नव्हती. पण बायकोचा रुसवा सहन करण्याची ताकद नव्हती, म्हणून गप्प बसलो. पण यामुळेच ही मंडळी सोकावतात. रेल्वेत अनेकजण भीतीने त्यांना पैसे काढून देतात. एखादा निर्ढावलेला दुर्लक्ष करतो तेव्हा ते सरळ त्याच्या अंगचटीला येतात. त्यानेही एखादा बधला नाही तर सरळ त्याचा गाल धरतात. तिथे पैसे मिळो अथवा न मिळो पण पुढल्या मंडळींची पाचावर धारण बसते. ते आधीच हातात पैसे काढून ठेवतात. त्यांच्याकडून तर आशीर्वादाची अपेक्षाही नसते कोणाची.

या वर्षी गावोगावी पूर आले. अनेकांनी पूरग्रस्त निधी गोळा केले. अनेकांनी गाड्या भरून जीवनावश्‍यक वस्तूंची मदत केली. पण ते सगळं करत असताना अनेकांना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. सेल्फी काढले गेले. समाजमाध्यमांवर टाकले गेले. मदतीच्या ट्रक, टेम्पोवर आपल्या, नावाचा, पक्षाचा उल्लेख करायला कोणी विसरत नव्हतं. अशा रीतीने केलेली मदत गरजवंताच्या उपयोगी नक्कीच पडेल पण त्यातून पुण्याची प्राप्ती कशी होईल?
मी सोलापूरहून पुण्याला येत होतो. पुन्हा ट्रेनचा प्रवास. पुन्हा गर्दी. नेहमीचं चित्रं. नेहमीचेच भिकारी. मी माझ्या सीटवर. माझ्या उजव्या बाजूला मुलगा आणि पत्नी. डाव्या बाजूच्या सीटवर तीन म्हाताऱ्या. सत्तरीच्या आसपास पोहचलेल्या. तिघींना एकमेकींचा आधार. ग्रामीण भागातल्याच असाव्यात. दोघींचा काष्टा होता. एक आपली गोल साडी नेसलेली. वेणीफणी केलेली. नीटनेटक्‍या होत्या. आपापली बाचकी सांभाळत होत्या. त्यांच्याकडे आरक्षण असावं असं तर मला वाटत नव्हतं. पण त्यांना कुणी उठवलं नाही. त्याही सुखाने बसून राहिल्या.

कुर्डवाडीच्या स्टेशनवर गाडी थांबली. उतरणारे उतरले. चढणारे चढले. पण उतरले कमी, चढले जास्त. एक कुटुंब त्यांचं आरक्षित सीट शोधत आलं. त्या तिन्ही म्हाताऱ्यांना जागा रिकामी करावी लागली. उभं राहून प्रवास करणं शक्‍य नव्हतंच त्यांना. त्यांनी तिथेच खाली अंग चोरून बैठक मारली. गाडी तुडुंब भरलेली होती. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या, फेरीवाल्यांच्या लाथा त्यांना लागत होत्या. काहीजण मुद्दामच लाथा मारत होते. येत जाता त्याचे पाय कचाकच तुडवत होते. मी तर एका फेरीवाल्याला, “ठीक से नही चल सकता है क्‍या?’ असं म्हणत हटकलं देखील.

माझ्या बाजूला बसलेल्या आजीबाईंना सारखीच झोप लागत होती. त्या सारख्याच डाव्या उजव्या बाजूला कलंडत होत्या. झोप मोड होऊन स्वतःला सावरत होत्या. पुन्हा पेंगत होत्या. मला वाटलं सासूला, सून झोपूच देत नाही की काय? आता पुणे स्टेशन जवळ आलं होतं. म्हातारीची, बऱ्यापैकी झोप झाली होती. तिने पिशवीतून खोबरेल तेलाची नवीकोरी बाटली काढली. पांढऱ्याशुभ्र डोक्‍याला तेल चोपडलं. पिशवीत खालीवर केलं. पुन्हा सगळं जागच्या जागी ठेवलं. मी म्हटलं, “आजी, झोप झाली नाही का रात्री?’ म्हातारी काहीच बोलली नाही. तिने नुसती मान हलवली. त्याचा अर्थ होकारार्थी घ्यावा की नकारार्थी ते मला कळेना. पण मी “झोप झाली’ असा अर्थ घेत विचारलं, “मग सारख्या पेंगताय कशाला?’ म्हातारी मनोमन लाजली. “काही नाही.’ एवढंच म्हणाली. मी म्हटलं, “आजी कुठे निघालात?’ म्हणाल्या, “पुण्याला.’ त्यावर मी विचारलं, “कोण आहे पुण्यात?’ “कुणी न्हायी. आळंदीला जायाचं हाव पुढं.’ मी ऐकत नाही म्हटल्यावर म्हातारीने पुढची माहिती पुरवली. त्यावर मी म्हटलं, “कुठं वारीला निघालात का?’ म्हातारीने फक्त होकारार्थी मान हलवली.

मला काय वाटले कुणास ठाऊक, मी खिशात हात घातला. शंभराची नोट हातात आली. ती म्हातारीला देत म्हणालो, “आजी हे असू द्या तुम्हाला. खर्चिला होतील वारीत.’ म्हातारीला ते पैसे घेताना लाज वाटत असावी. तिचा स्वाभिमान सुद्धा जागा असावा. म्हणाली, “नगं. माझ्याकडं मस पैकं हायती.’ मला काय करावं कळेना. माझा हेतू अगदीच शुद्ध होता. पण म्हातारी काही पैशाला शिवत नव्हती. तेव्हा मी म्हणालो, “आजी, भीक नाही ही. तुमच्या लेकाने दिलेत असं समजा.’ तेव्हा कुठे म्हातारीने पैसे घेतले. कनवटीला लावले. थोड्यावेळाने मी माझ्या पत्नीला आणि मुलाला विचारलं, “मी शेजारच्या म्हातारीला शंभर रुपये दिल्याचं माहीत आहे का तुम्हाला?’ दोघेही नाही म्हणाले. मी माझ्या उजव्या हाताने दिलेलं दान माझ्या डाव्या हातालाच काय, मी सांगितलं नाही तोवर माझ्या घरच्यांनाही कळालं नव्हतं. मी सत्पात्री दान पडल्याचा आनंद अनुभवत होतो. तेही कोणत्याही पुण्य प्राप्तीची अपेक्षा न करता.

विजय शेंडगे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here