स्मृती मानधना ; महिला क्रिकेटची युवराज्ञी

भारताच्या क्रिकेट वर्तुळात आजवर ज्या खेळाडूंनी आपल्या खेळाने चाहत्यांच्या मनावर राज्य केले, त्यात अग्रक्रमाने घ्यावे लागेल असे नाव म्हणजे मराठमोळी स्मृती मानधना. तसे पहायला गेले तर आजच्या आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटमधील भारतीय संघात अनेक गुणवान खेळाडू आहेत, पण मानधनाचा दर्जा एका वेगळ्याच उंचीचा आहे. मानधना ही महिला क्रिकेटची विराट कोहली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

कोल्हापूरजवळच्या सांगलीतील ही खेळाडू आज जागतिक क्रिकेट गाजवत आहे, ते केवळ आणि केवळ गुणवत्तेच्या आधारावर. मिताली राज, हरमनप्रीत कौर, झुलान गोस्वामी, पुनम यादव अशा कितीतरी नैपुण्यवान खेळाडू संघात असताना जे मानधना करते ते यातील एकीनेही या आधी केले नाही. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2 हजार धावांचा पल्ला गाठताना तिने प्रत्यक्ष कोहलीच्या कामगिरीला देखील मागे टाकले. आज ती केवळ 23 वर्षांची आहे, पण अजून किमान दहा वर्षांची तिची कारकिर्द निश्‍चितच आहे. या काळात अगदी शांता रंगास्वामींपासून ते मिताली राजपर्यंतच्या खेळाडूंची कामगिरी मागे टाकून वैयक्तिक कामगिरीचा उच्चांक प्रस्थापित करण्याची तिची क्षमता आहे. 19 वर्षांखालील विभागीय स्पर्धेत तिने महाराष्ट्राकडून गुजरातविरुद्ध खेळताना एकदिवसीय लढतीत द्विशतकी खेळी केली तेव्हाच खरेतच तिच्याकडे खेळपट्टीवर उभे राहण्याचा संयम असल्याचे जाणकारांना समजले. त्यापुर्वी तिच्याकडे कोणी गांभीर्याने पाहत नव्हते, मात्र तिने कधीही याबाबत उघडपणे नाराजी दर्शविली नाही.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरप्रमाणे तिनेही आपल्या टीकाकारांना अपल्या खेळानेच उत्तर दिले. आताच वेस्ट इंडिज व त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तिला दुखापतीचा सामना करावा लागला होता. पण सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकल्यावर तिने निर्णायक लढतीत एक अजरामर खेळी केली. तिला साथ देताना नवोदित शेफाली वर्माने जास्त भाव खाल्ला असला तरी मानधनाची कामगिरी कुठेही कमी पडली नाही. वयाच्या विशीतच तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) पुरस्कारामध्ये बाजी मारली. तिला वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला. उच्च दर्जाचा खेळ करण्यासाठी खरेतर खेडेगावातून खेळाडू शहरात येतात पण मानधनाच्या परिवाराने ती दोन वर्षांची असताना सांगलीला स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला.

तिचा भाऊ क्रिकेटपटू आहे, त्याच्यासह खेळताना मानधनाला या खेळाची गोडी लागली व आज ती भावाच्याही दोन पावले पुढे गेली आहे. तिने क्रिकेटच्या सराव शिबिरात आपली चुणुक दाखविली. शैली, संयम आणि तंत्र पाहून केवळ वयाच्या नवव्या वर्षीच पंधरा वर्षांच्या महाराष्ट्राच्या संघात तिची निवड झाली. महिलांच्या चॅलेंजर स्पर्धेत इंडिया रेडकडून खेळताना तिने इंडिया ब्ल्यू संघाविरुद्ध केवळ 62 चेंडूत 82 धावांची आक्रमक खेळी करत संघाला विजेतेपद मिळवून दिले. याच खेळीची दखल घेत तिची विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघात वर्णी लागली. बांगलादेशविरुद्ध एकदिवसीय सामन्यांत पदार्पण करताना तिने 25 धावांची खेळी केली होती, मात्र हा सामना संघाने 45 धावांनी जिंकला होता, त्यामुळे तिच्या खेळीचे महत्त्व सहज लक्षात येते. इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवताना तिने दुसऱ्या डावात अर्धशतकी खेळी करत आपली गुणवत्ता सिद्ध केली.

इंडियन प्रीमिअर लीगच्या धर्तीवर सुरु झालेल्या ऑस्ट्रेलियातील बिग बॅश स्पर्धेत सहभागी होणारी मानधना भारताची पहिलीच खेळाडू ठरली होती, मात्र अचानक झालेल्या दुखापतीने तिला या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. तिला दुखापतीतून सावरण्यासाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला, मात्र तिने इंग्लंडविरुद्ध 90 धावांची खेळी करत आपले पुनरागमन धडाक्‍यात साजरे केले. मुळातच डावखुरे फलंदाज अत्यंत शैलीदार असतात. मानधनादेखील त्याला अपवाद नाही. ती केवळ फलंदाज नसून उपयुक्त मध्यमगती गोलंदाज म्हणूनही यशस्वी आहे. तिने केवळ दोनच कसोटी सामने खेळले असले तरी मर्यादित षटकांचे 50 एकदिवसीय सामने तर 25, टी-20 सामने खेळले आहेत. भारतीय क्रिकेटचे नाव घेतले की काही काऴापुर्वी फक्त पुरुषांच्या क्रिकेटबाबतच चर्चा होत होती. आज ही परिस्थिती बदलली आहे. मिताली राज, अंजुम चोप्रा यांनी भारतीय महिला क्रिकेटला सुगीचे दिवस आणले. या खेळाडूंनी जो पाया रचला त्यावर मानधनाने कळस चढविला. ती आज प्रत्येक मालिकेत विक्रमांचा नवा अध्याय लिहीत आहे.

मानधनाच्या कामगिरीची दखल घेत केंद्रसरकारने तिचा अर्जुन पुरस्कार देऊन गौरव केला. आज सातत्यपुर्ण कामगिरीच्या जोरावर ती यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करत आहे, मात्र तिचे स्वप्न आहे की पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघाला विश्‍वविजेतेपद मिळवून देण्याचे. 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत ही स्पर्धा होत असून त्यापूर्वी मायदेशात झालेल्या मालिकांमध्ये तिने सरस कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाला संभाव्य विजेते बनविले आहे. 2017 साली झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम लढतीत अपयश आले व उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या पराभवामुळे निराश न होता संघ पुन्हा सज्ज झाला ते जागतिक महिला क्रिकेटवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी.

आज ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व न्यूझीलंड यांचे आव्हान मोडून काढताना मानधनाने अनेक नवोदित खेळाडूंसमोर आदर्श निर्माण केला. आज सचिन किंवा कोहलीकडून प्रेरणा घेत लाखो मुले क्रिकेटकडे वळतात तसेच स्मृतीचा आदर्श ठेवून देशातील अनेक मुली क्रिकेट खेळू लागल्या आहेत. शांता रंगास्वामींच्या निवृत्तीनंतर जसे अनेक गुणवान महिला खेळाडू पुढे आल्या तसेच स्मृतीची प्रेरणा घेत आज गल्लोगल्ली गुणवत्ता असलेल्या महिला खेळाडू पुढे येत आहेत. सध्या संघात पदार्पण केलेल्या व प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या शेफाली वर्मासारख्या कितीतरी खेळाडू तयार होत आहेत. याच खेळाडूंच्या कामगिरीमुळे येत्या काळात भारताचा महिला संघ जागतिक महिला क्रिकेटवर अधिराज्य गाजवेल यात शंका नाही.

शेफालीची चुणुक
स्मृतीप्रमाणेच शेफाली वर्मा ही आणखी एक गुणवान खेळाडू देशाला मिळाली. वयाच्या केवळ 15 व्या वर्षीच तिची भारतीय संघात वर्णी लागली. तिने सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. संघात वयाच्या पंधराव्या वर्षी पदार्पण करणारी शेफाली इतक्‍या लहान वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिलीच खेळाडू ठरली. नुकत्याच वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या मालिकेतील खेळीद्वारे ती सर्वात लहान वयात अर्धशतक साकारणारी पहिलीच भारतीय फलंदाज ठरली. सचिन तेंडुलकरची कामगिरी मागे टाकून सर्वात लहान वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक फटकावणारी पहिली भारतीय खेळाडूचा मान देखील शेफालीने मिळविला.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 लढतीत शेफालीने 35 चेंडूत नाबाद 69 धावांची खेळी केली. तिच्या खेळीत 10 चौकार व 2 षटकारांचा समावेश होता. मूळची रोहतकची असलेल्या शेफालीला क्रिकेटची प्रचंड आवड होती म्हणून ती प्रशिक्षण घेण्यासाठी अनेक अकादमींमध्ये जात होती पण ती एक मुलगी असल्याने तिला कोणत्याही अकादमीने प्रवेश दिला नाही. मग तिच्या पारिवारीक नातेवाईकाने युक्ती शोधून काढली.

शेफालीचा बॉयकट केला व त्यावेळी तिचा एका अकादमीत क्रिकेटचा शास्त्रशुद्ध सराव सुरू झाला. ती अकादमी शेफालीच्या घरापासून 8 किलोमीटर अंतरावर होती पण तरीही शेफाली रोज सायकलने हा प्रवास करत क्रिकेटसाठी हवी ती मेहनत घेत होती. जयपूर येथे झालेल्या स्पर्धेत शेफालीने आक्रमक फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. ती खेळी पाहूनच तिची भारताच्या संघात निवड झाली. तिने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण साजरे केले. तरी देखील तिच्या खेळावर जाणकार फारसे समाधानी नव्हते.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या नुकत्याच संपलेल्या मालिकेत तिने जी आक्रमकता दाखविली, त्यामुळे तिच्याकडे आदराने पाहिले जाऊ लागले. मिताली राज तसेच स्मृती मानधना यांच्याकडून प्रेरणा घेत शेफाली आपली कामगिरी व गुणवत्तेच्या बळावर एक सर्वसामान्य खेळाडू ते संघाच्या फलंदाजीचा कणा बनत आहे. कमी वयामुळे तिच्यासमोर खूप मोठा आणि उज्ज्वल भविष्यकाळ आहे, आणि ती सगळ्या परिस्थितीला तसेच कठीण आव्हानांना धिराने सामोरी जाईल व स्मृती मानधनाप्रमाणेच यशाची एकेक शिखरे पादाक्रांत करेल असा विश्‍वास वाटतो.

– अमित डोंगरे

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here