वाघोली (पुणे) – येथील माजी पोलीस पाटील व उपसरपंच रामकृष्ण हेमचंद्र सातव पाटील यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. जिल्हा नियोजन समितीला सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाने नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली. यामध्ये शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुरंदरचे आमदार संजय जगताप यांच्यासह जिल्ह्यातील वेगवेगळ्या एकूण 17 नवीन सदस्यांची समितीमध्ये निवड झाली आहे.
जिल्ह्यातील पंचायती व नगरपालिका यांच्या गरजा लक्षात घेऊन संपूर्ण जिल्ह्यासाठी विकास योजनेचा मसुदा तयार करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यरत असते. जिल्ह्याच्या वार्षिक नियोजन आराखड्यानुसार शासनाकडून जो निधी वर्ग होतो. त्याचे नियोजन, विकासकामांचा प्राधान्यक्रम निश्चित करणे, विकासकामे सुचविणे आदी कामे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून केली जातात. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याची जबाबदारी या समितीवर सोपविलेली आहे. एका वित्तीय वर्षात समितीच्या कमाल चार बैठका होणे अपेक्षित असते. या माध्यमातून अशासकीय सदस्यांना जिल्हा नियोजन समितीकडून आवश्यक असणारी सांख्यिकी व इतर माहिती प्राप्त करून घेता येते.
वाघोली परिसरातून यापूर्वी संजय अमृतराव सातव पाटील, दादासाहेब सातव पाटील यांनी देखील जिल्हा नियोजन समितीवर कामकाज पाहिले आहे. वाघोलीचे माजी उपसरपंच रामकृष्ण सातव पाटील यांच्या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.