सातारा -सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व शिरवळ भागाचे नेते उदय कबुले करोनाबाधित आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेतील एक कर्मचारी पण पॉझिटिव्ह आला आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवार ते रविवार अशी चार दिवस जिल्हा परिषद लॉकडाऊन होणार आहे.
जिल्ह्यात सध्या करोनाने हाहाकार माजवला आहे. जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या शिरवळमध्ये करोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. शिरवळ परिसरात झालेल्या एका वाढदिवस पार्टीने शिरवळ परिसरात करोनाचा शिरकाव झाला. त्यातच शिरवळ परिसरात कंपन्यांनचे मोठे जाळे आहे. पुण्यातून येणारे कंपन्यांचे अधिकारी खंडाळा तालुक्यात आल्याने त्यांची लागण कामगारांना झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले यांच्या मुलांना यापूर्वी करोना लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर कबुले यांचाही स्वॅब घेण्यात आला. त्यात त्यांना करोना झाल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. मात्र या घटनेने जिल्हा परिषद हादरली आहे, खंडाळा तालुकाही हादरला आहे.
उदय कबुले यांच्यासह एक कर्मचारी पण बाधित आला आहे. या घटनेने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी बुधवारी रात्रीच कर्मचाऱ्यानी कार्यालयात न येण्याचे आवाहन केले आहे. गुरुवार आणि शुक्रवारी दोन दिवस संपूर्ण इमारत सॅनिटाइज करण्यात येणार आहे. शनिवारी आणि रविवारी सुट्टी असल्याने आता सोमवारी जिल्हा परिषद सुरू होण्याचे संकेत आहेत.