धारदार शस्त्राने केले वार; संशयित पसार, शोधासाठी पोलीस पथके रवाना
कराड – शुभम रवींद्र चव्हाण (वय 22, रा. वडोली निळेश्वर, ता. कराड) याचा प्रेमसंबंधातून कराड येथील कार्वे नाका परिसरात शनिवारी दुपारी 3 वाजता धारदार शस्त्राने वार करून, खून करण्यात आला. या घटनेने खळबळ उडाली आहे. खून केल्यानंतर हल्लेखोर पसार झाला असून, त्याच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. हा संशयित कार्वे नाका परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शुभम चव्हाण याचे कार्वे नाका येथील चर्चजवळ सलून आहे. शुभम आणि संशयितामध्ये एका मुलीच्या प्रकरणावरून काही दिवसांपूर्वी प्रीतिसंगम परिसरात वाद झाला होता. त्यावेळी शुभमने संशयिताला मारहाण केली होती. पूर्वी झालेला वाद मिटवण्यासाठी शुभम चव्हाण हा मित्रांसोबत शनिवारी दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास कार्वे नाका येथे संशयिताकडे गेला.
त्यावेळी संशयित व शुभम चव्हाण यांची बाचाबाची झाली. बाचाबाची सुरू असताना संशयिताने धारदार शस्त्राने शुभमच्या गळ्यावर, पाठीवर, पोटावर व कानावर सपासप वार केले. यातील दोन वार वर्मी लागल्याने शुभम जागेवरच कोसळला. हे पाहून संशयिताने पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला परिसराल नागरिकांनी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे आणि कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून रक्ताचे नमुने आणि वस्तूंवरील ठशांचे नमुने घेतले आहेत. शुभमच्या मारेकर्याची ओळख पटली असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. संशयित लवकरच ताब्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी सांगितले.