कराड -वारूंजी, ता. कराड येथे सुशीला सुनील शिंदे (वय 35) व त्यांच्या बहिणीचा दोन वर्षांचा मुलगा विराज निवास गायकवाड यांचा निर्घृण खून झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. या दोघांचे मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडले असून, या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
प्राथमिक तपासात दोघांचाही गळा चिरून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सुशीला व विराज यांना काही दिवसांपूर्वी अरविंद सुरवसे याच्यासोबत काही जणांनी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे संशयित म्हणून सुरवसे याचा शोध पोलीस घेत आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुशीला शिंदे या वारुंजी (विमानतळ) येथे त्यांच्या आईसोबत राहत होत्या. सुशीला यांच्या बहिणीचा मुलगा विराजही तेथे राहत होता. सुशीला विराजला घेऊन शनिवारी (दि. 21) घराबाहेर पडल्या. त्या दिवशी नातेवाइकांनी त्यांचा शोध घेतला; परंतु त्या न सापल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.
पोलिसांनी चौकशी केली असता, सुशीला व विराजला अरविंद सुरवसे याच्यासोबत पाहिल्याचे काही जणांनी सांगितले. त्यानुसार विराजला घेऊन जाणाऱ्या सुशीला व अरविंद यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्याचा तपास सुरू असतानाच वारूंजी येथे घरात सुशीला व विराज यांचे मृतदेह आढळले.
पोलीस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, कराड शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, सपोनि अमित बाबर व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. दरम्यान, सुशीला व अरविंद यांची मैत्री होती. सुशीला विराजला घेऊन वारुंजी येथे गेली असावी, अशी शक्यता बी. आर. पाटील यांनी व्यक्त केली. अरविंद हा एका बिअर बारमध्ये नोकरीस होता. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.