नवी दिल्ली : देशातून करॉनची दुसरी लाट कमी होत असल्याचे चित्र सर्वत्र असतानाच आता काळजीत टाकणारी माहिती समोर येत आहे. करोनाच्या एका नव्या ‘सुपर व्हेरिएंट’ चा म्हणजेच ‘कोविड-२२’ चा प्रादुर्भाव पुढच्या वर्षी वाढणार असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा व्हेरिएंट सध्याच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षाही अधिक धोकादायक असून ज्यांचे लसीकरण झालेले नाही असे लोक याचे सुपर स्प्रेडर्स बनण्याची शक्यता आहे असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे.
अद्यापही भारतात 12 वर्षांच्या आतील बालकांचे लसीकरण करण्यात आले नाही. त्यामुळे येत्या काळात हा वयोगट करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा सुपर स्प्रेडर्स ठरु शकेल अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
झ्युरिकमधील संसर्गतज्ज्ञ असलेले प्रो. साई रेड्डी म्हणतात की, “सध्याच्या डेल्टा प्लस आणि इतर करोनाच्या स्ट्रेन्सपासून एक नवीन आणि अधिक धोकादायक व्हेरिएंट निर्माण होण्याची शक्यता आहे. करोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने देशात आणि जगभरात मोठा प्रादुर्भाव पसरवला. त्यामुळे अनेक देशांतील परिस्थिती अत्यंत बिकट बनली होती.
नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव हा त्यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही वर्षात केवळ एकदाच करोनाची लस घेऊन उपयोग होणार नाही तर अधिक लसी घ्याव्या लागतील. एकापेक्षा अधिक लसीच या नवीन व्हेरिएंटची शक्ती कमी करु शकतील आणि त्याच्या प्रादुर्भावाविरोधात लढा देऊ शकतील.”
करोनाच्या भविष्यातील नविन व्हेरिएंटशी लढायचं असेल तर आपल्याला केवळ एकाच लसीवर अवलंबून राहून चालणार नाही. एकापेक्षा अधिक लसी आणि त्याही पलिकडे जाऊन इतर मार्गही शोधावे लागतील असेही प्रो. साई रेड्डी यांनी स्प्ष्ट केले आहे.