सातारा- सातारा जिल्ह्यात करोना लसीकरण मोहीम गतीने राबवण्यात येत असून, आतापर्यंत 24 लाख 54 हजार 555 नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे. 17 लाख 68 हजार 4 नागरिकांनी पहिला तर 7 लाख 6 हजार 551 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत, अशी माहिती लसीकरण विभागाचे नोडल अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के यांनी दिली.
जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्र व अनेक गावांमध्ये लस उपलब्ध करून देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत सातारा जिल्हा अग्रेसर आहे. महालसीकरण मोहिमेत एक लाख 22 हजार लोकांना लस देऊन जिल्ह्याने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे. सर्वच तालुक्यांमध्ये मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 36 हजार 309 हेल्थ वर्करनी पहिला, तर 30 हजार 420 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 54 हजार 654 फ्रंटलाइन वर्करनी पहिला, तर 46 हजार 663 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 18 ते 45 वर्षे वयोगटातील आठ लाख सात हजार 313 नागरिकांनी पहिला, तर एक लाख नऊ हजार 535 नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत.
45 ते 60 वर्षे वयोगटातील चार लाख 77 हजार 754 नागरिकांनी पहिला, तर दोन लाख 71 हजार 892 जणांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 60 वर्षांवरील तीन लाख 91 हजार 974 नागरिकांनी पहिला, तर दोन लाख 48 हजार 41 नागरिकांनी दोन्ही डोस घेतल्याची माहिती डॉ. शिर्के यांनी दिली.