सातारा – आठवडा बाजारासंदर्भात तोडगा काढण्याचा प्रयत्न करू

खा. उदयनराजेंचे कोरेगावच्या व्यावसायिकांना आश्‍वासन

सातारा -छोटे व्यापारी व शेतकऱ्यांसाठी ग्रामीण भागातील आठवडा बाजारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. करोनामुळे अनेक ठिकाणचे आठवडा बाजार बंद आहेत. सध्या बहुतांश व्यवहार सुरु झाल्याने आठवडा बाजारही सुरू करण्याची मागणी होत आहे. त्याबाबत योग्य निर्णय घेण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे आग्रह धरू, असे आश्‍वासन खा. उदयनराजे भोसले यांनी राजहंस प्रतिष्ठानचे सदस्य व व्यावसायिकांना दिले.

कोरेगावचा आठवडा बाजार सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन खा. उदयनराजेंना देण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कोणत्याही बाजारावर त्या त्या भागातील आर्थिक उलाढाल अवलंबून असते. त्याला आठवडा बाजार अपवाद नाही. सध्या फक्‍त मास्क वापरणे, सॅनिटायझेशन, हात धुणे, गर्दी न करता व्यवहार करणे, हेच करोनावर नियंत्रण मिळवण्याचे उपाय आहेत. परिस्थिती हाताबाहेर जाणे कोणालाही परवडणारे नाही.

कोविडच्या दुसऱ्या लाटेचा फटका अनेकांना बसला आहे. गतवर्षी आणि यावर्षी करोनामुळे अनेकांचे संसार विस्कळीत झाले आहेत. आर्थिक व मनुष्यहानी परवडणारी नाही. त्यामुळे याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागेल.

काही निर्बंध घालून आठवडा बाजार सुरू करता येईल का, याचा विचार करावा लागणार आहे. याबाबत संबंधित यंत्रणेकडे तोडगा काढायचा आग्रह धरू, असे आश्‍वासन उदयनराजेंनी दिले.जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुनील काटकर, राजहंस प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत पवार, ऍड. विनित पाटील, राजवंश आठवडे बाजार संघटेनेचे सदस्य उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.