सातारा – मिळकतकराच्या 67 लाखांच्या थकबाकीवर पालिकेची चुप्पी

सातारा – येथील पोवई नाक्‍यावरील रजतसागर हॉटेल या प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिकाची मिळकतकराची तब्बल 67 लाख रुपयांची थकबाकी आहे. ती वसूल करण्याऐवजी या व्यावसायिकाला नोटीस बजावण्याचा “फार्स’ पालिका प्रशासनाने केला. त्यामुळे या व्यावसायिकाचा “गॉडफादर’ कोण, हे शोधायची वेळ आली आहे.

सातारा पालिकेच्या करवसुलीची चर्चा फारशा गांभीर्याने होताना दिसत नाही. केवळ “मलईदार’ टेंडरची चर्चा होत असते. पोवई नाक्‍यावरील एका प्रसिद्ध व्यावसायिकाच्या हॉटेलचा तब्बल 67 लाख रुपयांचा मिळकतकर थकीत आहे. कोणाचा तरी “वरदहस्त’ असल्याने या व्यावसायिकाची मालमत्ता अद्याप सील करण्यात आलेली नाही. पालिकेच्या अधिकाऱ्याने केवळ नोटीस बजावण्याचे “कर्तव्य’ पार पाडल्याने या प्रकरणात असलेल्या राजकीय दबावाची कल्पना येते.

पोवई नाक्‍यावर सर्व्हे नं. 174/175 मधील रजतसागर हॉटेलला 67 लाख 38 हजार रुपये थकबाकी भरण्यासंदर्भात पालिकेने 26 मार्च रोजी नोटीस बजावली होती. थकबाकी व शास्ती न भरल्यास स्थावर व जंगम मालमत्ता सील करावी लागेल, असा इशारा मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी या नोटिशीद्वारे दिला होता; परंतु सहा महिने उलटूनही हॉटेल व्यावसायिकाने थकबाकी व पूर्ण दंड भरला नाही, अशी चर्चा आहे.

संबंधिताने दंड भरला आहे, तर तो किती, हे समजत नाही. काही सतर्क नागरिकांनी माहितीच्या अधिकाराखाली ही माहिती मागविल्यावर हे प्रकरण उजेडात आले. पोवई नाका म्हणजे साताऱ्याचे नाक आहे. येथील रजतसागर हॉटेलच्या आवारातील बऱ्याच जागा या भाडेकरारावर देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे पालिकेचा महसूल कमी झाला आहे.

या व्यावसायिकावर राजकीय वरदहस्त असल्याने हॉटेलच्या आवारात अतिक्रमण असलेली संरक्षक भिंतही पालिका प्रशासन हटवू शकत नाही, अशी चर्चा आहे. तत्कालीन वसुली अधिकारी मोहन प्रभुणे यांनी चौदा वर्षांपूर्वी या व्यावसायिकावर कारवाई केल्याने राजकीय वादंग निर्माण झाले होते. आता विद्यमान वसुली अधिकारी पेन्शन बंद होण्याच्या भीतीने कारवाई करत नसल्याची चर्चा आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.