मल्हारपेठ (सातारा)- पाटण तालुक्यातील सांगवड पुलानजीक नाडे गावच्या हद्दीत काल (दि. 22) रोजी रात्री नऊच्या सुमारास दुचाकीची समोरासमोर धडक झाली. या भीषण आपघातात तीन जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले.
नितीन बबन तिकुडवे (वय 36, रा. शिदेवाडी ता. पाटण), भरत रामचंद्र पाटील (वय 43) व बबन धोंडीराम पडवळ (वय 70, दोघेही रा. येरफळे ता पाटण) असे अपघातातील मृतांची नावे आहेत. अनिकेत ज्ञानदेव पाटील व संकेत सीताराम शिंदे (वय 21) हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास नवा रस्ता ते मरळी जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर नाडे नवारस्ता या गावच्या हद्दीत सांगवड पुलाजवळ मोटारसायकल (एमएच 50 ई 7229) वरील चालक नितीन बबन तिकुडवे हा अनिकेत ज्ञानदेव पाटील याला मागे बसवून भरधाव वेगात घेऊन जात होता. त्यावेळी समोरून मरळी ते नवारस्ता बाजूकडे निघालेल्या मोटारसायकलला (एमएचई 2510) जोराची धडक दिली. ही धडक एवढ्या जोरात होती की दोन्ही दुचाकीचा अक्षरशः चक्काचुर झाला.
यात नितीन तिकुडवे जागीच ठार झाले. तर भरत पाटील, बबन पडवळ व संकेत शिंदे (रा. तामकणे) व अनिकेत पाटील हे चार जण गंभीर जखमी झाले. त्यांना कराड येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. उपचारादरम्यान भरत पाटील व बबन पडवळ हे मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अनिकेत पाटील व संकेत शिंदे गंभीर जखमी असून त्यांच्यावर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. समोरासमोर झालेल्या या अपघातामध्ये पोलिसांना घटनास्थळी अपघातग्रस्त मोटरसायकलीजवळ केक व दारूच्या बाटल्यांचे काचेचे तुकडे आढळून आले.
रॉंग साईडला जाऊन जोराची धडक देऊन अपघात करून स्वतःचे तसेच भरत पाटील व बबन पडवळ यांच्या मृत्यूला कारणीभूत झाल्याप्रकरणी नितीन तिकुडवे याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील, पोलीस कॉन्स्टेबल जाधव यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमींना पुढील उपचारासाठी कराडला पाठवले. अपघाताची फिर्याद मल्हारपेठ पोलीस ठाण्यातील हवालदार नानासाहेब कांबळे यांनी दिली. पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील तपास करत आहे.