टोकियो – चीनच्या संभाव्य हल्ल्यापासून तैवानचे संरक्षण करण्याची ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्षपद स्विकारल्यानंतर आशिया खंडाच्या आपल्या पहिल्याच दौऱ्यामध्ये बायडेन यांनी चीनच्या वाढत्या विस्तारवादी धोरणाला आव्हान दिले आहे. तैवानबाबतचे अमेरिकेचे धोरण आतापर्यंत संरक्षणदृष्ट्या संदिग्ध राहिले होते.
मात्र बायडेन यांच्या वक्तव्यानुसार अमेरिका या धोरणातून बाहेर येत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. जपानच्या दौरयावर असताना बायडेन यांना पत्रकारांनी तैवानच्या मुद्यावर छेडले. जर चीनने तैवानवर हल्ला केला, तर अमेरिका तैवानचे संरक्षण करेल का? असे विचारले असता बायडेन यांनी “हो’ असे उत्तर दिले.
“तैवानचे संरक्षण करणे ही आमची वचनबद्धता आहे. “वन चायना’ धोरण आम्हाला मान्य आहे. त्या संदर्भातील करारावर अमेरिकेने स्वाक्षरीही केली आहे. मात्र हे बळजबरीने मिळवले जाऊ शकत नाही. बळाचा वापर मान्य केला जाऊ शकत नाही.’ असे बायडेन म्हणाले. चीनकडून असाप्रकारे बळाचा वापर केला जाणार नाही. किंवा तसा प्रयत्नही केला जाणार नाही, असेही बायडेन म्हणाले.
तैवानला संरक्षण पुरवण्यासाठी अमेरिकेला कायदा करावा लागेल. मात्र तैवानबाबत अमेरिकेने नेहमीच संदिग्धता कायम ठेवली आहे. चीनकडून तैवानवर संभाव्य हल्ल्याला अमेरिका लष्करी उत्तर देईल का, हा नेहमीच एक अनुत्तरीत प्रश्न राहिला होता.